१४ वर्षांपासून नोकरी न मिळाल्याने ‘त्या’ कुटुंबाची उपासमार
By Admin | Updated: November 15, 2014 22:52 IST2014-11-15T22:52:12+5:302014-11-15T22:52:12+5:30
जून २००० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या रिक्त जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती़ यास १४ वर्षांचा कालावधी लोटला असताना

१४ वर्षांपासून नोकरी न मिळाल्याने ‘त्या’ कुटुंबाची उपासमार
पुलगाव : जून २००० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या रिक्त जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती़ यास १४ वर्षांचा कालावधी लोटला असताना कारवाई केली नाही़ यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश सफाई मजदूर काँगे्रसने निवेदनातून केली आहे़
हरिजन मेहतर समाजाचे रामू बोदू सारसर हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कायमस्वरूपी सफाई कामगार पदावर कार्यरत होते़ सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या परिवारातील सदस्याला नोकरी मिळावी म्हणून सारसर परिवाराने सतत पाठपुरावा केला; पण संबंधित प्रशासनाने त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला नाही़ यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप प्रदेश सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश महामंत्री पी़बी़ भातकुले यांनी केला आहे़ राम सारसर यांच्या निवृत्तीनंतर शासनाच्या लाडपागे कमिटीच्या परिपत्राकानुसार रामूची सून माया सारसर हिला सफाई कामगार पदावर घ्यावे, यासाठी त्यांनी संस्थेकडे रितसर अर्ज सादर केला; पण ती इयत्ता चवथी उत्तीर्ण नसल्याचे कारण सांगून तिला नोकरी देण्याचे संबंधित प्रशासनाने अमान्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले़ यानंतर रामू सारसर यांनी त्यांचा नातू आकाश पुनमचंद सारसर याला सफाई कामगार पदी सामावून घेण्याबाबत अर्ज केला; पण आकाश इयत्ता दहावी उत्तीर्ण असताना त्याला नोकरी दिली नाही, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला़ वास्तविक, अशा प्रकरणांत ३० दिवसांच्या आत नियुक्तीचे प्रावधान व शासन धोरण आहे; पण संस्था टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली़(तालुका प्रतिनिधी)