खासदार व आमदारांमध्ये रंगला दुहेरी सामना
By Admin | Updated: February 19, 2017 01:48 IST2017-02-19T01:48:13+5:302017-02-19T01:48:13+5:30
तालुक्यातील ६ जि.प. गट व १२ पं. स. गणाच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. या भागातील काँग्रेसचे आ. रणजित कांबळे व भाजपाचे खा. रामदास तडस

खासदार व आमदारांमध्ये रंगला दुहेरी सामना
चुरस : तिरंगी लढतीचे चित्र
हरिदास ढोक देवळी
तालुक्यातील ६ जि.प. गट व १२ पं. स. गणाच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. या भागातील काँग्रेसचे आ. रणजित कांबळे व भाजपाचे खा. रामदास तडस या दोन नेत्यादरम्यानचा हा दुहेरी सामना ठरला. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हेसुद्धा याच भागातील असल्याने हा तालुका हायटेक ठरला. काहींसाठी ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम तर आ. कांबळे यांच्यासाठी संघाचा कानोसा घेणारी होती. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे प्रयत्न होताना दिसला.
जि.प. व पं.स. च्या या निवडणुकीत आ. कांबळे हे पक्षाच्या वतीने सोळाण्याचे मालक असल्याचे अनुभवण्यात आले. उमेदवारांच्या चाचपणीपासून तर अखरेच्या क्षणापर्यंत त्यांचे कसब पणाला लागले होते. विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांत त्यांनी आपली मुंबईवारी ज्या पद्धतीने घडवून आणली. तीच रणनिती या निवडणुकीत पाहण्यात आली. आपल्या उमेदवारांच्या दृष्टीने अडचणीचे वाटणारे नामांकन मागे घेण्याचे कौशल्य दाखविण्यात आले. महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांचा सुद्धा यामध्ये सहभाग राहिला. या सर्व बाबीचा अभाव भाजपा नेतृत्वात जाणवला. भिडी जि.प. व पं.स. मतदार संघात यामुळे सरळ लढत झाली. या गटात भाजपाचे भिसे यांच्यासाठी खा. तडस व काँग्रेसचे वसू यांच्यासाठी आम. कांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. भिडी हा भाग आ. कांबळे यांच्यासाठी महत्वपूर्ण असल्याने सर्वच बाबीचा अवलंब निवडणुकीत बघायला मिळाला. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या गुंजखेडा जि.प. गटात काँग्रेसने अनुसूचित जातीतील भारती ठोंबरे यांना उमेदवारी दिली. मागासवर्गीयांची मते जास्त हे विशेष. बसपाच्या तिखाडे यांचे उमेदवारीमुळे या मतदार गटात रंगत आली. गौळ जि.प. गटात काँगे्रस व भाजपातील लढतीला अपक्षांनी आव्हान दिल्याने चुरस बघायला मिळाली. मतांची विभागणी व क्रॉस वोटींगला अपेक्षित समजून या ठिकाणच्या उमेदवारांनी चांगलाच धसका घेतल्याची चर्चा आहे. अंदोरी जि.प. गटात पाटील समाजाने आपल्या उमेदवाराला उचलून धरल्याचे बोलले जात आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य संजय कामनापुरे व भाजपाच्यावतीने विद्यमान पं.स. सदस्य सचिन कुऱ्हाटकर यांच्यातील लढत चांगलीच गाजल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे.