खरसखांडा ते ठाणेगाव रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: May 29, 2016 02:22 IST2016-05-29T02:22:24+5:302016-05-29T02:22:24+5:30
खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे.

खरसखांडा ते ठाणेगाव रस्त्याची दुरवस्था
काम निकृष्ट दर्जाचे : ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी
कारंजा (घा.) : खरसखांडा ते ठाणेगाव हा तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी सरपंच विकास नासरे व ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
काही वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला होता. डांबरीकरणही झाले; पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहने तर सोडा पायी चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना ठाणेगाव, कारंजा येथे ये-जा करावी लागते. दुचाकी वा चार चाकी वाहनांना या रस्त्याने जाताना असह्य त्रास सहन करावा लागतो.
पूढे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. गत निवडणुकीत हा रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलीत; पण निवडणुकीची आश्वासने पाळण्यासाठी नव्हे तर मते घेण्यासाठी असतात, या नियमानुसार हा रस्ता अद्याप दुरूस्त झाला नाही. यामुळे हा रस्ता त्वरित दुरूस्त करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, असा ठराव खरसखांडा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. सदर ठराव व निवेदन सरपंच विकास नासरे, उपसरपंच विनोद नारनवरे व ग्रामस्थांनी आ. अमर काळे यांना पाठविले आहे. शिवाय संबंधित विभागांनाही निवेदन व ठरावाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. याकडे लक्ष देत रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)