निळ्या दिव्याच्या वाहन चालकाचा हॉटेलात धिंगाणा
By Admin | Updated: October 23, 2016 02:18 IST2016-10-23T02:18:24+5:302016-10-23T02:18:24+5:30
‘शासकीय वाहनांचा वर्धेत गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना आहेत. यात आणखी भर पडली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहन चालकाने

निळ्या दिव्याच्या वाहन चालकाचा हॉटेलात धिंगाणा
हॉटेल मालकाने दिला चोप : पैसे देण्यावरून केली शिवीगाळ
वर्धा : ‘शासकीय वाहनांचा वर्धेत गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना आहेत. यात आणखी भर पडली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहन चालकाने हॉटेलात जात नशेत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला. यात अखेर वाहन चालकाच्या धिंगाण्याने त्रस्त झाल्याने हॉटेल मालकाने या वाहन चालकाला चांगलाच चोप दिला. या घटनेची चर्चा शहरात दिवसभर असून या प्रकरणी अधिकाऱ्यांनी शोध घेत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुधवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान यवतमाळ-नागपूर बायपासवर असलेल्या एका हॉटेलमध्ये निळा दिवा असलेले शासकीय वाहन गेले. त्या वाहनात अधिकारी नाही तर केवळ चालकच होता. चालकाने वाहनातून उतरून हॉटेलमध्ये जाऊन पाण्याची बॉटल व दोन पापड मागितले आणि खिशातील दारूची शिशी काढून तेथेच रिचवायला सुरुवात केली. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनातून उतरलेला चालक चक्क ही पातळी पार करीत असल्याचे पाहून हॉटेलमधील इतर ग्राहकांना आश्चर्य वाटले. चालक महाशय हळूहळू नशेत झिंगत राहिले. जेव्हा बील द्यायची वेळ आली तेव्हा सदर वाहन अमुक अमुक अधिकाऱ्याचे आहे, अशी धमकी देत अधिकाऱ्याच्या नावाचा उद्धार करायला सुरुवात केली. पाहता-पाहता चालकाची जीभ घसरली आणि त्याने हॉटेलमालकाला शिवीगाळही करायला सुरुवात केली. शेवटी सहनशीलता संपल्यावर मालकानेही चालकाला चोप देत त्याची जागा दाखवून दिली. चालकाच्या या प्रतापामुळे एका जबाबदार अधिकाऱ्याचीही नामुष्की झाली. त्यामुळे आता शासकीय वाहनचालकांना आवर घालण्याची गरज असून या वाहन चालकावर कारवाई गरजेची आहे.(प्रतिनिधी)
शासकीय वाहने चालकांच्या ताब्यात
वर्धा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात शासकीय वाहने रात्रीला चालकांच्या ताब्यात असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार चालकाने ते कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. जिल्ह्याचा मुख्य अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची वाहने त्यांच्या चालकांच्या ताब्यात राहतात. या चालकांकडून त्या वाहनाचा रात्रीच्या वेळी काय उपयोग होतो, याची कधी शहानिशा होत नाही.