चालक व वाहक जागीच ठार

By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:20+5:302015-12-05T09:08:20+5:30

दुचाकीला धडक देत पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक व वाहक ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाले तर दुचाकी चालक जखमी झाला.

Driver and carrier killed on the spot | चालक व वाहक जागीच ठार

चालक व वाहक जागीच ठार

कुरझडी येथील घटना : माती आणण्याकरिता जाणारा ट्रक उलटला
वर्धा : दुचाकीला धडक देत पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक व वाहक ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाले तर दुचाकी चालक जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरझडी (फोर्ट) येथे घडली. ट्रक चालक विकास गायकवाड रा. शांतीनगर व वाहक नरेश सोनुले रा. नागठाणा अशी मृतकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदी (मेघे) परिसरातील एका वीटभट्टीकरिता माती आणण्याकरिता ट्रक एम एच ०४ एस ५४२ ने चालक विकास गायकवाड व वाहन नरेश सोनुले हे दोघे जात होते. दरम्यान, कुरझडी (फोर्ट) येथील वायफड येथून कुरझडीकडे जात असलेल्या एमएच ३२ एल ९२९३ या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालक राजू सराटे रा. कुरझडी (फोर्ट) हा जखमी झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर नागरिक आपल्यामागे लागतील या भीतीपोटी विकास याने वाहन भरधाव चालवून पळण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रकखाली दबून ट्रक चालक व वाहक दोघेही गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी दोनही जखमींना उपचारार्थ रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी भादंविच्या २७९, ३३७, ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मृतकांत विकास गायकवाड रा. शांतीनगर व वाहक नरेश सोनुले यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)

आॅटोरिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
बोरधरण- येथून बोरी गावाकडे येत असलेल्या दुचाकीला विरूद्ध दिशेने आलेल्या आॅटोने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाले. हा अपघात बोरधरण ते हिंगणी मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झाला. बोरधरण येथून राजेंद्र गणपत भांगे (४२) व सागर विजय वानखेडे (२०) दोघेही रा. बोरी हे एमएच ३२ - ३८४८ या दुचाकीने बोरीकडे येत होते. दरम्यान ईश्वर वासुदेव कोवार याने त्याच्या ताब्यातील एमएच ३२-४२८२ हा आॅटो भरधाव चालवून दुचाकीवर धडक दिली. यात राजेंद्र भांगे व सागर वानखेडे हे दोघेही जखमी झाले. दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र सेलू येथे आणण्यात आले असता प्रथमोपचारानंतर सागर वानखेडे याला सेवाग्राम येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Driver and carrier killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.