ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पिण्याचे पाणी
By Admin | Updated: May 22, 2014 01:21 IST2014-05-22T01:21:08+5:302014-05-22T01:21:08+5:30
पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर उन्हाळ्यात ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ आली आहे.

ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पिण्याचे पाणी
सेलू : पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर उन्हाळ्यात ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ आली आहे. याला सचिवांचे दुर्लक्षीतपण व सरपंचाचे अज्ञान कारणीभूत ठरत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या स्त्रोतांची खोली वाढली. अनेक ठिकाणी पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. अनेकांचे नळ खड्डय़ात आहे. तेव्हा नळांना येणारे पाणी घेणे झाल्यावर त्या खड्डय़ातील दूषित झालेले पाणी पुन्हा नळाद्वारे परत जाते. अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह व लिकेजमुळेही पाणी दूषित होते. अशावेळी नियमित पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावा, असा सूचना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (आरोग्य) ग्रामसेवकांना नियमित देतात. मात्र काही वेळकाढू ग्रामसेवक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात व ब्लिचिंग पावडर टाकत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ येते. लहानमोठय़ा आजाराचे रुग्ण यामुळे दवाखान्यात गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक लहान ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा ग्रामपंचायतींसाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून पन्नास टक्के अनुदानावर ब्लिचिंग पावडर पुरविल्या जाते. तालुक्यात असलेल्या ६२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींना हे पावडर सद्या पुरविल्या गेले, मात्र यासाठी पंचायत समितीची तुटपूंजी आर्थिक तरतुदही धक्कादायकच आहे. पंचायत समितीने शेष फंडातून पन्नास हजार रुपयांच्या ब्लिचिंग पावडरची खरेदी केली.यात ५५0 रुपये नगाप्रमाणे ३५ किलोच्या ६२ ब्लिचिंग पावडरच्या बॅग खरेदी केल्या. त्या ५0 टक्के अनुदानावर २७५ रुपये नगप्रमाणे ४२ ग्रामपंचायतींना दिल्या. काही ग्रा.पं.ना दोन तर काहींच्या वाट्याला एकच बॅग आली. ब्लिचींग पावडर नियमित टाकल्यावर तो किती दिवस पुरेल, हा प्रश्न आहे. अनेक ग्रामपंचायत हे पावडर जास्त दिवस पुरले पाहिजे म्हणून नियमित टाकत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्पनाच्या मोठय़ा ग्रामपंचायतींना शंभर टक्के रक्कम भरुन हे पावडर घ्यावे लागते. मात्र ते दर्जेदार व आयएसआय मार्क असावे, याची काळजी घेत ज्यांनी ७२ बॅग पुरविल्या. त्याच वितरकाकडून दर्जेदार पावडर देण्यासाठी पं.स.ने करारनामा केला. ज्या मोठय़ा उत्पन्नाच्या ग्रामपंचायती आहे. त्यांना ५५0 रुपये बॅगप्रमाणे हे ब्लिचिंग पावडर पुरविण्याचे धोरण असल्याचे सांगितले. पावसाळा तोंडावर आहे. आर्थिक स्थिती खराब असलेल्या ग्रामपंचायतीकडे असलेले ब्लिचिंग पावडर संपणार आहे. सद्या अनेकाकडे साठाच उपलब्ध नाही. पंचायत समितीने केवळ शेषफंडातून पन्नास हजार एवढी तुटपूंजी तरतुद केली. आरोग्याच्या महत्त्वपूर्ण जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल कुणाचीच गंभीरता दिसून येत नाही.(तालुका प्रतिनिधी)