दिग्गजांचे स्वप्न भंगले

By Admin | Updated: June 11, 2016 02:28 IST2016-06-11T02:28:31+5:302016-06-11T02:28:31+5:30

मिनिमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी, अशी अनेक दिग्गजांची मनोमन इच्छा असतानाच ..

The dreams of veterans broke | दिग्गजांचे स्वप्न भंगले

दिग्गजांचे स्वप्न भंगले

जि.प.अध्यक्षपद : अनुसूचित जमातीसाठी राखीव
वर्धा : मिनिमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी, अशी अनेक दिग्गजांची मनोमन इच्छा असतानाच शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद आरक्षणाची सोडत निघाली. यात वर्धेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले. परिणामी अध्यक्षपदाचे स्वप्न रंगवित असलेल्या अनेक दिग्गजांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला, तर कधी अध्यक्षपदी आपली वर्णी लागेल, याचा विचारही केला नाही, अशांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात एकंदरीत ‘कही खुशी कधी गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वर्धा जिल्हा परिषदेची निवडणूक मार्च २०१७ मध्ये होऊ घातली आहे. निवडणुकीच्या कालावधीची माहिती मिळताच जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या विविध प्रवर्गातील अनेक दिग्गजांनी अध्यक्षपद भुषविण्याचे स्वप्न मनोमन रंगविले होते. यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नाना ढगे, विजय जयस्वाल, कलावती वाकोडकर यांच्यासह विद्यमान उपाध्यक्ष विलास कांबळे, माजी जि.प. उपाध्यक्ष संजय कामनापूरे, जि.प. सदस्य मनोज चांदूरकर, गजानन गावंडे तसेच माजी शिक्षण व आरोग्य सभापती मारेश्वर खोडके यांच्या आगामी निवडणुकीत अध्यक्षपदावर डोळा होता.
गत पंचवार्षिकेत अध्यक्षपदापासून वंचित राहणाऱ्या या दिग्गजांनी येत्या पंचवार्षिकेत जिल्हा परिषद आपलीच, असे म्हणत कामही सुरू केले होते. त्यांनी आपल्या सर्कलमधील मतदारांशीच नाही तर पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डींग’ लावणे सुरू केले होते. यात काहींनी आपल्याला यश येत असल्याचा गवगवाही करणे सुरू केले होते. अशात अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव झाल्याने त्यांचा पुरता हिरमोड झाला. अध्यक्षपदाच्या त्यांच्या आशा जागीच विरल्या.
आज जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला तर ज्यांनी अध्यक्षपदाचा विचारही केला नाही त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. आता आपणही अध्यक्ष होऊ शकतो असे वाटणे स्वाभाविकच आहे. सध्या सत्तेत असलेल्या या प्रवर्गाच्या उमेदवारांना अध्यक्षपदाच्या आशा असल्या तरी नव्या प्रभाग रचनेत त्यांचे आरक्षण कायम राहाते वा ते रद्द होवून नवे आरक्षण येते याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. विद्यमान स्थितीत जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या अनुसूचित जमातीचे सातही सदस्य आपल्या सर्कलचे आरक्षण कायम रहावे, यावर लक्ष केंद्रीत करून आहे. हे त्यांचे स्वप्न दिग्गजांप्रमाणे भंग होते वा ते पूर्ण करण्याची संधी मिळते याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The dreams of veterans broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.