दहशत पसरवणारी ‘पिंकी’ बोर प्रकल्पात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कारंजा (घा.) तालुक्यातील नागरिकांसह पशुपालकांच्या अडचणीत भर टाकणारी तसेच परिसरात दहशत पसरविणारी वाघिण पिंकी ...

दहशत पसरवणारी ‘पिंकी’ बोर प्रकल्पात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा (घा.) तालुक्यातील नागरिकांसह पशुपालकांच्या अडचणीत भर टाकणारी तसेच परिसरात दहशत पसरविणारी वाघिण पिंकी असल्याचे व ती सध्या बोर प्रकल्पाकडे परतल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. दोन दिवसांपूर्वी तिला गस्त घालणाऱ्या चमुने नवरगाव भागातील रेस्ट हाऊस परिसरात बघितल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले. पिंकी राखीव वनात परतल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वासच सोडला आहे. असे असले तरी नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारंजा तालुक्यातील आगरगाव येथील एका तरुणाला वाघाने ठार केले. शिवाय नंतर वाघाने नांदोरा येथील रामराव गहाट यांच्या मालकीची गाय तर मरकसूर येथील आसाराम बैगणे यांच्या मालकीची बैल जोडी ठार केल्याने नागरिकांत वनविभागाबाबत रोष वाढला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी गावागावात जाऊन नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले.
परिसरात वाघाची दहशत कायम असतानाच काही नागरिंकांनी आगरगाव भागात वाघासोबत बछडा बघितल्याचे पुढे आल्यानंतर तो वाघ की वाघिण याची शहानिशा करण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले; पण दहशत पसरविणारा वाघ कॅमेरात कैद झाला नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तिन्ही घटनास्थळांची बारकाईने पाहणी केली असता वाघाच्या पावलांचे ठसे आढल्याने परिसरात वाघाचा वावर असल्याच्या विषयावर शिक्कामोर्तब झाला. दोन दिवसांपासून दहशत पसरविणारा वाघ शोध घेऊनही आढळून न आल्याने युवराज हा वाघ तर पिंकी ही वाघिण सध्या नेमकी कुठे आहे याबाबतची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पिंकी ही वाघिण कारंजा परिसरात दहशत पसरवून गेली असावी या निकषावर वनविभाग सध्या पोहोचला आहे.
कोण आहे पिंकी?
पिंकी ही वाघिण कॅटरीना या वाघिणीचा बछडा आहे. कॅटरीणाचा छावा युवराज व पिंकी वाघिण यांचे वास्तव्य पूर्वी गरमसूर, धानोली, मेटहिरजी, काजळी, कारंजा, कोंढाळी या भागात होते. पिंकी ही तरुण वाघिण असून काही महिन्यांपूर्वी तिने पिल्ले दिले असावे आणि त्यानंतर ती कारंजा तालुक्यातील आगरगाव, नांदोरा, मरकसुर या भागात आली असावी, असाही अंदाज सध्या लावला जात आहे.
उन्हाळ्यात आढळले वाघाच्या बछड्याच्या पावसाचे ठसे
कधी नव्हे अशी भीषण पाणी टंचाई यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात होती. विशेष म्हणजे वन्यप्राण्यांना तृष्णातृप्तीसाठी जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ठिकठिकाणी कृत्रिम पानवठे तयार करून त्यात नियमित पाणी भरण्यात आले. यात काही सामाजिक संघटनांचे आणि काही वन्यजीव प्रेमींचे सहकार्य लाभले. कारंजा तालुक्यातील जंगल परिसरात एका पानवठ्यावर ट्रॅक्टरने पाणी टाकण्यासाठी जात असलेल्यांना व्याघ्र दर्शन झाले होते. त्यानंतर दक्ष राहून कृत्रिम पानवठ्यात पाणी भरण्यात आले. मात्र, एका वन्यप्राणी मित्राला त्याच कृत्रिम पानवठ्याच्या परिसरात वाघाच्या बछड्याच्या पावसाचेही ठसे आढळले होते. शिवाय या परिसरात युवराज आणि पिंकी या दोन वाघांचा वावर असल्याने पिंकीने पिल्ले दिले असावे, असा अंदाज वर्तविला जात असून त्यांची शहानिशा सध्या अधिकाºयांकडून केली जात आहे.