डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लढा उभारा
By Admin | Updated: April 14, 2016 02:45 IST2016-04-14T02:45:56+5:302016-04-14T02:45:56+5:30
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे.

डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लढा उभारा
महेश मात्रे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव
वर्धा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित राजकीय नेतृत्वात आंबेडकरी नेत्यांना अनेकदा संधी मिळाली; पण सामाजिक व आर्थिक लढा अद्याप अपुरा आहे. तो पूर्ण केल्याशिवाय सर्वांगीण प्रगतीची दारे खुली होणार नाही. तेव्हा बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचा लढा उभारावा, असे आवाहन आयबीएन लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक महेश मात्रे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्त शहर समितीतर्फे मंगळवारी पोलीस मैदान येथे आयोजित पर्व दिन सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अर्थतज्ञ श्रीकांत बारहाते, माजी जि.प. सदस्य विजय आगलावे, आयबीएन लोकमत मुंबईचे विनोद राऊत, समिती संयोजक अतुल दिवे, अध्यक्ष विशाल रामटेके, जनसंपर्क प्रमुख महेंद्र मुनेश्वर विचार मंचावर उपस्थित होते.
दीक्षाभूमी व चैत्यभूमी आंबेडकरी अनुयायांची प्रेरणाभूमी-बारहाते
वर्धा : नागपूरची दिक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी या दोन्ही आंबेडकरी अनुयायांची प्रेरणाभूमी आहे. वर्धाच्या या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती सोहळा मन भारावणारा आहे. या भूमीतून आंबेडकरी अनुयायांना अशीच प्रेरणा मिळत राहो, असे मत बारहाते यांनी व्यक्त केले. मान्यवरांचा परिचय विनोद राऊत यांनी करून दिला. प्रास्ताविक व संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले तर आभार अतुल दिवे यांनी मानले. शहर उत्सव समितीतर्फे संयोजक प्रमोद राऊत यांनी अतिथींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. युवप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. याप्रसंगी सर्वत्र जयभीमचा नारा गुंजला. विचार मंचावरील प्रेम धांदे मुंबई, साधना मेश्राम पुणे व संच यांच्या मार्गदर्शनात सादर झालेल्या बुद्ध, भीम गीतांच्या प्रबोधनाने वातावरण मंगलमय झाले. संपूर्ण पोलीस मैदान आंबेडकरी कार्यकर्त्यांनी फुलले होते. कार्यक्रमाला पंकज लभाने, नितीन कुंभारे, आशिष सोनटक्के, सुरेंद्र पुनवटकर, संदेश भित्रे, राजू वैद्य, रत्नमाला साखरे, अविनाश नागदेवते, आकाश पाझारे, आदित्य मांडाळे, बादल शेळके, प्रदीप भगत, अमित गजभिये, आशिष लोखंडे, अक्षय फुलझेले, प्रणीत मानकर, प्रदीप ठोंबरे, सोनू सहारे, संदीप नगराळे, राहुल पिंपळकर, बाबा बडगे व समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)