मनरेगाच्या मजुरांकडून घरगुती कामे
By Admin | Updated: November 14, 2015 02:25 IST2015-11-14T02:25:30+5:302015-11-14T02:25:30+5:30
पर्यावरणाला हातभार लागावा, गावखेडी, हिरवीगार व्हावी व नागरिकांना शुद्ध हवा मिळावी म्हणून मरनेगा अंतर्गत वृक्षलागवडीचा मोठा कार्यक्रम राबविल्या गेला.

मनरेगाच्या मजुरांकडून घरगुती कामे
धानोली येथील प्रकार : सरपंचाने करून घेतली रंगरंगोटी
सेलू : पर्यावरणाला हातभार लागावा, गावखेडी, हिरवीगार व्हावी व नागरिकांना शुद्ध हवा मिळावी म्हणून मरनेगा अंतर्गत वृक्षलागवडीचा मोठा कार्यक्रम राबविल्या गेला. यातील झाडे जिवंत रहावी याकरिता मनरेगांतर्गत मजूर देण्यात आले. त्यांच्याकडून केवळ वृक्षसंवर्धनाचे काम करणे गरजेचे असताना धानोली (मेघे) येथील सरपंचाने या मजुरांकरवी स्वत:च्या घराची रंगरंगोटी करून घेतल्याची ओरड होत आहे. शिवाय त्यांच्याकडून इतरही कामे करून घेण्यात येत असून यात आर्थिक घोळ होत असल्याचा आरोप आहे.
मनरेगा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत वृक्षलागवडीचा धडक कार्यक्रम राबविल्या गेला. त्यांच्या संगोपनासाठी नियमित मजूर कामावर आहे. मात्र सेलूला लागून असलेल्या या ग्रा.पं.च्या सरपंचाने या मजुरांकडून दिवाळीपूर्वी घराला रंगरंगोटी करायला लावली. या कामाकरिता नकार दिल्यास कामावरून कमी करण्याची धमकी दिल्याचे नानरिक बोलत आहेत. या कामाचा खर्च मात्र मनरेगांतर्गत लावल्याचीही चर्चा आहे. यामुळे या कामावरील मजुरांना आपण शासकीय कामावर आहोत की, सरपंचाचे ‘सालदार’ हा प्रश्न पडला आहे.
या मजुरांकडून गावातील नाल्या साफसफाई करणे व गाळ काढण्याचे कामही केल्या गेले. एवढेच नव्हेतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेले बॅनरही प्रवेशद्वारावर बांधून घेण्यात आले. एकीकडे याच गावात वृक्ष लागवडीचे तिनतेरा वाजले आहे. दहा टक्केही झाडे जिवंत नाहीत. या वृक्ष संवर्धनाकडे त्या सरपंचाचे लक्ष नाही आणि ग्रामसेवकही हतबल असल्याचे दिसते. या प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)