जनतेला सेवा देताना सेवावृत्ती बाळगा
By Admin | Updated: February 2, 2016 01:55 IST2016-02-02T01:55:42+5:302016-02-02T01:55:42+5:30
शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना कोषागार विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग ठरतो.

जनतेला सेवा देताना सेवावृत्ती बाळगा
अंकित गोयल : कोषागार दिनानिमित्त विविध कार्यक्रम
वर्धा : शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना कोषागार विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग ठरतो. सर्व विभागाच्या समन्वयातून जनतेला चांगल्या सेवा उपलब्ध करून द्या, सेवावृत्ती बाळगा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.
जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिनानिमित्त सोमवारी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंकित गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी शरद पराते होते. प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक स्मिता पाटील, मुख्य लेखा व कोषागार अधिकारी शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा परिषद वरिष्ठ कोषागार अधिकारी आडकर, निवृत्त कोषागार अधिकारी वागदकर व आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हा कोषागार कार्यालयाचे काम हे जिल्ह्यातील विविध कार्यालयातील आर्थिक योजनांच्या निमंत्रणाचे असल्याचे सांगतांना मार्च महिन्यात कामाचा व्याप वाढतो. आर्थिक शिस्ताची भूमिका बजावतांना प्रत्येक विभागामध्ये समन्वय ठेवण्याचे कौशल्य सुध्दा हा विभाग उत्तम प्रकारे करीत असल्याचे सांगितले. शरद पराते यांनी दैनंदिन काम योग्य प्रकारे करताना कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासणे आवश्यक आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राचे एक वेगळे जग आहे. येथेही आपल्या कामाची छाप ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिल गडेकर, प्रकाश डायरे, स्मिता पाटील, शेळके, आडकर, वागदकर, शरद जिचकार यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात विविध स्पर्धातील विजेत्यांना अंकित गोयल यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. स्वागत अप्पर कोषागार अधिकारी मानगावकर यांनी करून प्रास्ताविक केले.
यावेळी अप्पर कोषागार अधिकारी मसराम, भोयर लेखाधिकारी नगराळे, कोहळे, भेले, सोळंकी, अंड्रस्कर, बडागिलवार, फुलझेले, कुडे आदी उपस्थित होते. कोषागार कार्यालयातर्फे मालती चव्हाण यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तर कविता वाचन मुन, दीपक धाबर्डे, भोयर, मानगावकर यांनी केले. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मटका फोड, संगीत खुर्ची स्पर्धेत कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन दीपक धाबर्डे यांनी केले तर आभार अप्पर कोषागार अधिकारी मसराम यांनी आभार मानले. यावेळी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)