मन रमत नसल्याने काढला पळ
By Admin | Updated: November 18, 2014 22:59 IST2014-11-18T22:59:40+5:302014-11-18T22:59:40+5:30
सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उगले ले-आऊट येथून बेपत्ता झालेला निलेश राघवेंद्रप्रसाद त्रिपाठी (१३) हा त्याच्या मध्यप्रदेशातील चिरकीणी येथे आजोबाच्या गावी असल्याचे समोर आले आहे.

मन रमत नसल्याने काढला पळ
बेपत्ता मुलगा मध्य प्रदेशात आजोबाच्या गावी
वर्धा : सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उगले ले-आऊट येथून बेपत्ता झालेला निलेश राघवेंद्रप्रसाद त्रिपाठी (१३) हा त्याच्या मध्यप्रदेशातील चिरकीणी येथे आजोबाच्या गावी असल्याचे समोर आले आहे. तो तिथे सुखरूप असल्याची माहिती आल्याने या बाबत उडत असलेल्या साऱ्या अफवांना विराम लागला आहे. सेवाग्राम पोलिसांनी त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्याचे मन इथे रमत नसल्याने निघून गेल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१२ नोव्हेंबरपासून सेवाग्राम येथील उगले ले-आऊट येथील १३ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. याची तक्रार सेवाग्राम ठाण्यात करण्यात आली होती. त्याचे वय १४ वर्षांपेक्षा कमी असल्याने चौकशीअंती सेवाग्राम ठाण्यात तो बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच काळात वर्धेत नरबळीचा प्रकार घडल्याने या प्रकरणाकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात होते. पोलीस या प्रकरणाच्या तपासात फिरत असले तरी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्याचा शोध सुरू असताना सोमवारी रात्री अचानक त्याच्या सेवाग्राम येथील त्याच्या घरी तो चिरकीणी येथे असल्याचे माहिती मिळाली. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी चिरकीणी येथे त्याच्या घरी दूरध्वनीवर संपर्क साधून त्याच्याशी बोलून तो तिथे सुखरूप आहे अथवा नाही याची खात्री करून घेतली. यावेळी त्याच्याशी संपर्क संवाद साधला असता त्याने वर्धेत मन रमत नसल्याने तिथून येथे येण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती सेवाग्राम ठाण्यातून देण्यात आली. सध्या तो चिरकिणी येथे त्याची आजी ललिता अनिरूद्धप्रसाद त्रिपाठी व दोन मोठ्या बहिणीसह असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचे आजोबा अनिरूद्धप्रसाद त्रिपाठी हे सेवाग्राम येथेच असल्याचे सांगण्यात आले आहे. सेवाग्राम ते मध्यप्रदेशातील चिरकीणी येथील प्रवास करताना त्याच्याकडे केवळ २५० रुपये असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)