विवंचनेने करपलाय शेतकऱ्यांचा दीपोत्सव
By Admin | Updated: October 22, 2014 23:21 IST2014-10-22T23:21:43+5:302014-10-22T23:21:43+5:30
दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही.

विवंचनेने करपलाय शेतकऱ्यांचा दीपोत्सव
सेलू : दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही. अनेक शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची, याची चिंता आहे. दारात दिवाळीचा दिवा लावताना तेल टाकण्याची कुवत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गृहिणी कापसाच्या वाती कशाबशा भिजवून दीपोत्सव साजरा करताहेत; पण तेल नसल्याने दिवणालीतील वातही करपून जात असल्याचे विदारक चित्र आहे़
लहरी निसर्गाचा जबर फटका शेतकऱ्यांना यंदा बसला. दोन-तीन झालेच तर चार पोते प्रती एकराच्या वर सोयाबीनचा उतारा नाही. अनेकांनी सवंगणी केली नाही. पिकापेक्षा गवतच अधिक आहे. धान्य बाजारात तीन हजारांच्या वर भाव नाही. दिवाळीत बाजार समित्याही बंद आहेत़ ज्यांचे सोयाबीन निघाले, त्यांना विकण्याचीही अडचण आहे. अनेकांचे सोयाबीन निघायचे आहे. कपाशी अद्याप निघाली नाही़ काहींची शितादही झाली. बाजारपेठ सुरू झाली नाही. हातात पैसा नाही. सर्वच भिस्त शेतीवर असल्याने कर्ज फेडायचे की घरी खायचे, याचाही ताळमेळ नाही. शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांना दिवाळीला नवीन कपड्यांची वाणवाच आहे. चिमुकल्या मुलांनी नवीन कपडे, फटाके, मागितले की, पालकांची कालवा-कालव होते. सणालाही नवीन कपडे आपण देऊ शकत नाही, याचे दु:ख शेतकऱ्यांनी पचवायचे कसे, हा प्रश्न आहे. घरातील ही स्थिती पाहून गृहलक्ष्मी कधी नवीन साडीचा आग्रह करीत नाही; पण बाजूच्या एखाद्या नोकरदाराच्या पत्नीला आणलेली साडी पाहून तिचाही जीव करपलेल्या वातीसारखाच जळतो, हे विदारक वास्तव ग्रामीण भागात फिरल्याशिवाय दिसत नाही. गत दोन दिवसांत ग्रामीण भागात दिसलेले वास्तव पाषाणहृदयी व्यक्तींच्याही डोळ्यांतही पाणी आणल्याशिवाय राहत नाही. शारीरिकदृष्ट्या शेतकरी सक्षम दिसत असला तरी मनातून खचला आहे़ नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांची चिंता असेल तर ग्रामीण भागात जाऊन यावे, शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी, चिंता तपासून नुकसानग्रस्तांच्या तोंडाला कशी पाने पुसली, याचा लेखाजोखा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मांडावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताहेत़(तालुका प्रतिनिधी)