जिल्हा परिषदेच्या शाळांत होणार दिवाळी
By Admin | Updated: October 18, 2014 01:48 IST2014-10-18T01:48:22+5:302014-10-18T01:48:22+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिले होत असलेली दिवाळी यंदापासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांत होणार दिवाळी
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिले होत असलेली दिवाळी यंदापासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात शिक्षण विभाग व विविध शिक्षण संघटनांची सभा नुकतीच झाली. ही सभा शिक्षण सभापतींनी बोलावली होती. यावेळी सुरू सत्रापसून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरिता शिक्षणाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखविली आहे.
या कार्यक्रमांतर्गत दिवाळीच्या सुट्या लागण्याच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांनी आपसात निधी गोळा करून विद्यार्थ्यांना मिष्ठान्नासह शाळेची रंगरंगोटी व शाळेत सडा टाकून रांगोळी काढून साजवट काढणे आदी कार्यक्रम करावयाचे आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात एकाच दिवशी म्हणजे २० आॅक्टोबर रोजी करावयाचा आहे. शाळेत दिवाळी साजरी करण्यामागे ग्रामीण भागातील मुलांना शाळेकडे आकर्षित करणे हा असल्याचे सभातींचे म्हणणे आहे.
या कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने कुठलाही निधी मिळणार नाही. हा कार्यक्रम शिक्षकांनी स्वत: आपापसात वर्गणी करून करावयाचा आहे. यामुळे जिल्हा परिषदेत सध्या या कार्यक्रमावरून विविध चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही शिक्षक संघटनांनी सहमती दर्शविली तर काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे जिल्ह्यात हा कार्यक्रम साजरा होतो अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम राबविण्यात हयगय झाल्याने यापूर्वी एका संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. असे असले तरी शाळेत कार्यक्रम घेण्यासंदर्भात केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी याची माहिती शिक्षकांना देण्याकरिता केंद्रस्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शिक्षकांना हा कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)