विविध शिक्षक संघटनांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: September 21, 2014 23:55 IST2014-09-21T23:55:28+5:302014-09-21T23:55:28+5:30
संच निर्धारण तसेच समावेशाची प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी जिल्हा शिक्षण संस्था संघ, मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक परिषद, शिक्षकेतर कर्मचारी संघटना

विविध शिक्षक संघटनांचे धरणे आंदोलन
वर्धा : संच निर्धारण तसेच समावेशाची प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी जिल्हा शिक्षण संस्था संघ, मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक परिषद, शिक्षकेतर कर्मचारी संघटना व प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाद्वारे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी निवेदन देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला़
शिक्षण हक्क कायदा आणि माध्यमिक शाळा संहिता सेवा शर्ती अधिनियम डावलून शिक्षणाधिकारी (माध्य़) यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना २०१३-१४ चे संच निर्धारण उशिरा दिले़ यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली़ अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती तपशिलासह मुख्याध्यापकांनी द्यावी, याकरिता सक्तीचे आदेशही देण्यात आले. याविरूद्ध विविध शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला़ याबाबतची कार्यवाही व अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील कृती समिती सदस्यांची सभा झाली. संच निर्धारण रद्द करून समायोजनाची कारवाई थांबविण्यात यावी, असे निवेदन सादर करण्यात आले़ यातून विविध प्रलंबित मागण्याही लावून धरण्यात आल्या़ संच निर्धारण २०१३-१४ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी संघटनांच्यावतीने देण्यात आला.
सदर आंदोलनामध्ये व्ही.यु. डायगव्हाणे, विजय मुडे, शेषराव बिजवार, नरेशचंद्र वाळके, अरुण हर्षबोधी, सतीश राऊत, अॅड. दा.गु. देशमुख, रमेश धारकर, दीवाकर गमे, रवी शेंडे, सतीश जगताप, मनोहर बारस्कर, अनिल बाळसराफ, अजय वानखेडे, मोहन गलांडे, प्रदीप झलके, भालशंकर, बावणकर, बिडवाईक, सुरेश बरे, लोमेश वऱ्हाडे आदी सहभागी झाले़(कार्यालय प्रतिनिधी)