आयुक्तांकडे जि.प. सीईओंची तक्रार
By Admin | Updated: November 25, 2014 22:59 IST2014-11-25T22:59:54+5:302014-11-25T22:59:54+5:30
जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे

आयुक्तांकडे जि.प. सीईओंची तक्रार
वर्धा : जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे जि.प.तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या तक्रारींच्या माध्यमातून सीईओ मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला आहे.
महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वर्धा दौऱ्यानिमित्त विभागीय आयुक्त बुधवारी वर्धेत दाखल झाले. दरम्यान त्यांनी जि.प.चा आढावा घेतला. यावेळी सदर तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवर पुढे काय होते, याकडे आता जि.प. वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अध्यक्ष रणनवरे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये अध्यक्षाची निवड झाल्यापासून शिष्टाचार म्हणून सीईओ यांनी अद्यापही अध्यक्षाला कक्षात भेट दिली नाही, तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या तक्रारींमध्ये इतर सात बाबी समान असल्याचे दिसून येते. यामध्ये जि.प. मध्ये घेतलेल्या ठरावाची वेळीच अंमलबजावणी न केल्यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. निधी खर्च न झाल्यामुळे परत गेला. विकास कामांबाबत सीईओ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्याशी समन्यवय ठेवत नाही. विश्वासात घेत नाही. परिषदेतील पदे भरतीत गोंधळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त असल्याचेही नमूद केले आहे.
पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, हेकेखोर प्रवृत्ती व विकास कामांबाबतची माहिती न पुरविणे, कोणत्याही प्रकरणाची गांभिर्याने दखल न घेणे, चर्चा टाळणे, वारंवार अवमान करणे, भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर प्रतिसाद न देणे, अशा गंभीर तक्रारी केलेल्या आहेत. याप्रकरणी आपल्या स्तरावरुन चौकशी करुन तात्काळ बदली करण्याची शिफारस करण्याची मागणीही सदर तक्रारीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)