जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By Admin | Updated: April 13, 2016 02:16 IST2016-04-13T02:16:43+5:302016-04-13T02:16:43+5:30
श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींग सेलूचा मालक सुनील टालाटुले याने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये थकविले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
टालाटुले प्रकरण : अन्य पर्यायासाठी किसान अधिकारसह शेतकऱ्यांचे आंदोलन
वर्धा : श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींग सेलूचा मालक सुनील टालाटुले याने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये थकविले. या रकमेसाठी शासनाने टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले; पण सोमवारी न्यायालयाने लिलावावर तात्पूरती स्थगिती दिली. यामुळे किसान अधिकार अभियानसह शेतकऱ्यांनी शासनाने अन्य पर्याय वापरून रक्कम देण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
सोमवार व मंगळवारी कापूस व्यापारी टालाटुले याच्या स्थावर व जंगम संपत्तीचा लिलाव उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होऊ शकला नाही. यामुळे पिडीत शेतकऱ्यांमध्ये संशय व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १० मार्च रेजी विधान भवन मुंबई येथे सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत लिलाव प्रक्रियेत अडथळा आला तर अन्य पाच पर्याय ठेवण्यात आले होते. यातील जो आधी होईल, त्यातून शेतकऱ्यांचे कापसाचे चुकारे दिले जातील, असे ठरले होते. सोमवारी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यामुळे कापसाच्या चुकाऱ्याची रक्कम अन्य पर्यायातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी व किसान अधिकारने केली. कापसाचे थकलेले चुकारे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजता शेतकरी महिला, पुरूष दाखल झाले. चुकारे घेतल्याशिवाय परत जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर शेतकरी ठिय्या मांडूनच होते.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी (रेल्वे) व सेलूने घेतलेल्या कर्ज देण्याच्या ठरावाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आली. यावेळी किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, रामनारायण पाठक, सुदाम पवार, सोनुरकर, सोमनाथे, प्रा. नुतन माळवी यासह शेतकरी महिला, पुरूष उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)