जिल्हाधिकाऱ्यांनी केले मिर्झापूर येथे श्रमदान
By Admin | Updated: May 2, 2017 00:18 IST2017-05-02T00:18:04+5:302017-05-02T00:18:04+5:30
तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या मिर्झापूर (नेरी) येथे ग्रामस्थ श्रमदानातून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले मिर्झापूर येथे श्रमदान
वॉटर कप स्पर्धा : अधिकाऱ्यांच्या हजेरीने ग्रामस्थांतही उत्साह
आर्वी : तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या मिर्झापूर (नेरी) येथे ग्रामस्थ श्रमदानातून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे. यात आणखी उत्साह भरता यावा म्हणून सोमवारी महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी आर्वी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी श्रमदान केले. यामुळे ग्रामस्थांनाही प्रोत्साहन मिळाले.
आर्वी येथील गांधी विद्यालयाच्या एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक नागरे, किटे, मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य दर्भे, खोंडे व त्यांचे पथक, कला व वाणिज्य विज्ञान महा. आर्वीचे प्राचार्य हरिभाऊ विरूळकर, डॉ. पाटील, डॉ. राजू, डॉ. कालिंदी व इतर सहकाऱ्यांनी श्रमदान करीत सीसीटी बांधकाम पूर्ण केले. इंग्लिश स्कूलचे डाफे, जॉन व इतर शिक्षकांसह लॉयन्स क्लबचे डॉ. राणे व सभासद यांनी श्रमदान केले. मिर्झापूर येथील शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयाचे तरुण, गावातील महिला व नागरिकांतही या मान्यवरांच्या श्रमदानामुळे उत्साह संचारल्याचे पाहावयास मिळाले.
सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे सुमारे ५०० मिटर सीसीटीचे बांधकाम पूर्ण करता आले. वृक्षारोपण खड्डे व विहीर पुनर्भरणाचे कामही पूर्ण करण्यात आले. पूढील श्रमदानासाठी जिल्हाधिकारी नवाल व पथकाने ग्रामस्थांचे कौतुक केले. उपसरपंच प्रा. बाळा सोनटक्के यांनी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले तर ग्रामसचिव शेंदरे यांनी श्रमदानाचे आवाहन केले.(शहर प्रतिनिधी)
सावध (हेटी) गावात सीसीटी
पाणी फाऊंडेशनमार्फत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या आर्वी तालुक्यातील सावध (हेटी) या गावातही श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले आहेत. प्रशासनातील मान्यवर मंडळीही ग्रामस्थांच्या सहकार्यासाठी गावात पोहोचत असून सीसीटीचे काम केले जात आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून सीसीटीचे काम पूर्ण केले असून अन्य कामेही प्रगतिपथावर आहेत. श्रमदान करणारे हात वाढतच आहेत.