जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विद्यार्थ्यांना बक्षीस

By Admin | Updated: October 16, 2016 01:59 IST2016-10-16T01:59:13+5:302016-10-16T01:59:13+5:30

पडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल पोहोचले. या शाळेत त्यांच्या हस्ते शनिवारी हॅन्ड वॉश सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार होते.

The District Collector gave the prize to the students | जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विद्यार्थ्यांना बक्षीस

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विद्यार्थ्यांना बक्षीस

पडेगाव शाळेतील प्रकार : विद्यार्थ्यांच्या उत्तराने सारेच अवाक्
चिकणी (जामणी) : पडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल पोहोचले. या शाळेत त्यांच्या हस्ते शनिवारी हॅन्ड वॉश सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार होते. शनिवारी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती असल्याने त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कलाम यांच्याविषयी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिल्याने जिल्हाधिकारी नवाल यांनी शाबासकी म्हणून या विद्यार्थ्यांना पेन भेट दिले.
एका नियोजित कार्यक्रमानिमित्त शाळेत आल्या नंतर जिल्हाधिकारी नवाल यांनी शाळेची पाहणी केली. दरम्यान नवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज केले. याप्रसंगी भारताचे ११ वे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती विचारली. यावेळी मुलांनीही त्यांच्या प्रश्नाची व्यवस्थित उत्तरे दिली. ‘अब्दुल कलाम कोण होते, असे विचारताच सातव्या वर्गातील विद्यार्थी अक्षय वाघमारे याने उत्तर देत ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते, आणि शास्त्रज्ञ सुद्धा. स्वाती चवरे नामक विद्यार्थिनीने त्यांनी अग्नीपंख पुस्तक लिहिल्याचे सांगितले. शिवाय त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणूनही ओळखले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान बघून जिल्हाधिकारी ही जाम खूश झाले. त्यांनी बक्षीस म्हणून पेन भेट देत कौतुक केले.
यानंतर नियोजित कार्यक्रम झाला. शाळेला रोटरी क्लबच्यावतीने देण्यात आलेल्या हॅड वॉश स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यांनतर त्यांनी बचत गटांच्या महिलांसोबत संवाद साधला. बचत गटाच्या अध्यक्ष ललिता धायवट आणि लेखपाल रंजना खोब्रागडे यांच्यासह प्रेरिका त्रिशला फुलझेले यांनी गटाच्या उत्पन्न वाढीबाबत विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक उपाय सांगितले. गटातील महिलांच्या उत्पदान वाढीकरिता त्यांनी गावात कृषी केंद्र उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रोटरी क्लब गांधी सिटीच्या अध्यक्ष सुनीता इथापे यांनी हॅन्ड वॉश बद्दल माहिती दिली. रोटरी क्लबच्या सचिव संगीता इंगळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद पवार, गटअविकास अधिकारी इसाये, गटशिक्षणाधिकारी संतोष कोडापे, सरपंच त्रीशला फुलझेले, उपसरपंच नरेंद्र पहाडे, मुख्याध्यापक ताकसांडे उपस्थित होते. या शाळेत वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मुलांना मंगेश चोरे यांच्याकडून हॅन्ड वॉश लिक्विडचे डबे वाटप करण्यात आले. संचालन सहायक शिक्षिका कदम यांनी केले, तर आभार शेळके यांनी मानले. सोबतच विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. (वार्ताहर)

जामणी जि.प. शाळेलाही भेट
देवळी - तालुक्यातील जामणी जि.प. प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट दिली. यावेळी शाळेतील ई-लर्निंग साहित्य विद्यार्थ्यांना हाताळायला लावले. विद्यार्थ्यांनी ते सहज हाताळले. मुख्याध्यापक भारती इखार, प्रिया खरवडे यांनी शाळेत घेत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रेखा महाजन, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांदे, गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम, विस्तार अधिकारी राजेश रेवतकर, केंद्र प्रमुख रवींद्र पावडे उपस्थित होते.
तत्पूर्वी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित ग्रामस्थांसोबत पिकांविषयी माहिती जाणून घेतली. कृषी अधिकारी शेंडे यांच्यासोबत चर्चा करीत त्यांना सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी श्वेता पालवे, अतिरिक्त गटविकास अधिकारी बांगडकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, विस्तार अधिकारी दीपक चौधरी, सरपंच साधना येणेकर, रोशना वाढवे, पोलीस पाटील लक्ष्मण तिरळे, गणेश गिऱ्हे, वैशाली बिरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या कार्तीक बिरे याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या विविध समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: The District Collector gave the prize to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.