आयएसओ शाळेच्या भेटीत जिल्हाधिकारी अवाक्
By Admin | Updated: August 13, 2016 00:48 IST2016-08-13T00:48:04+5:302016-08-13T00:48:04+5:30
सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे मराठी माध्यमांची मुले इंग्रजी या विषयाचा न्यूनगंड बाळगतात.

आयएसओ शाळेच्या भेटीत जिल्हाधिकारी अवाक्
विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक : मॉडेल शाळा बनविण्याचा मानस
वर्धा : सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे मराठी माध्यमांची मुले इंग्रजी या विषयाचा न्यूनगंड बाळगतात. पण हे विधान खोटे ठरवित वर्धा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हावरे ले आऊट, सेवाग्राम येथील आय. एस. ओ. दर्जा प्राप्त जि. प. शाळेतील विद्यार्थी भविष्याचा वेध घेत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी नवाल यांनी सदर शाळेला भेट दिल्यावर तेही अवाक झाले. हीच ती मॉडेल शाळा जी मला अपेक्षित होती. असे गौरवोद्गार त्यांनी या भेटीत काढले.
यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक के. झेड. शेंडे, डायटचे प्राचार्य देशमुख, धांदे, गटशिक्षणाधिकारी कोडापे, संगीता महाकाळकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी वर्ग २ ते ४ च्या विद्यार्थ्यांकडून बेरीज व गुणाकार या क्रियेवर उदाहरणे सोडवून घेतली. काही इंग्रजीचे प्रश्न विचारले. उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आदित्य यादव या तिसरीच्या विद्यार्थ्यांला स्वत:चा पेनही बक्षीस म्हणून दिला.
मुळाक्षरांची बाग, नयनरम्य परिसर, विद्यार्थी वा शिक्षकांनी परिश्रमाने फुलविलेली पसरबाग, बागेत असलेले विविध प्राणी, ज्ञानरचनावादी वर्गरचना, आणि विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य याचा वापर येथील विद्यार्थी अध्ययनात करतात.
या शाळेत समर्पित भावनेने काम करणारे सुनिता नगराळे आणि प्रकाश कांबळे या शिक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. आय.एस.ओ. नामांकन मिळाल्याबाबत सर्वांचे अभिनंदनही करण्यात आले. ही शाळा जिल्ह्याची मॉडेल शाळा ठरवू असेही डायटच्या प्राचार्यांना यावेळी सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी)
प्रॅक्टिकल शिक्षणावर भर
पुस्तकी ज्ञानाने मुले केवळ शिकतात परंतु ते परिपक्व होत नाही. व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना घडविणारे असते. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सर्वांगिण विकासासाठी आवश्यक ज्ञान देण्याचा खटाटोप शिक्षक करीत आहेत. म्हणूनच शाळेला भेट दिल्यावर विद्यार्थ्यांची प्रगती पाहून जिल्हाधिकारीही अवाक झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही कौतुकाची थाप दिली.