पुलगावातील स्फोटाने जिल्हा हादरला
By Admin | Updated: June 1, 2016 02:33 IST2016-06-01T02:33:34+5:302016-06-01T02:33:34+5:30
पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोटाने अख्खा जिल्हा हादरला. पुन्हा पुलगाव परिसरातील नागरिकांना आपण बारूदच्या ढिगाऱ्यावर बसून असल्याची अनुभूती झाली.

पुलगावातील स्फोटाने जिल्हा हादरला
अनेकांची धाव केंद्रीय दारूगोळा भांडाराकडे : रस्त्यावर रात्रभर फिरली वाहने
वर्धा : पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोटाने अख्खा जिल्हा हादरला. पुन्हा पुलगाव परिसरातील नागरिकांना आपण बारूदच्या ढिगाऱ्यावर बसून असल्याची अनुभूती झाली. आजचा स्फोट हा आतापर्यंत घडलेल्या स्फोटापेक्षा भीषण असल्याच्या प्रतिक्रीया या परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते. मंगळवारी जिल्ह्याभर याच घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत होती.
या स्फोटामुळे जिल्ह्यातील भूमीच नाही तर जिल्हा प्रशासनही हादरले. राज्याचे व केंद्राचे मंत्री दाखल होणार असल्याने सावंगी रुग्णालयात जिल्ह्याची अख्खी यंत्रणा रुग्णालयात हजर झाली. मंत्री येणार असल्याने या भागात सुरक्षा आणखीच कडक करण्यात आल्याने जखमींना भेटण्याकरिता आलेल्यांची गर्दी आणखीच वाढत असल्याचे दिसून आले.
सोमवारी रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक अनेकांना हादरा बसला. हा हादरा कशाचा याचा शोध घेण्याकरिता पुलगाव शहरासह आसपासच्या गावातील नागरिकांनी इतरत्र नजरा फिरविल्या. यात त्यांना दारूगोळा भांडारातून आगीचे लोळ उठताना दिसले. येथील दारूगोळा भंडारात स्फोट झाल्याचे लक्षात येताच अनेकांना तिकडे अनेकांनी धाव घेतली. तर घटनास्थळावरून जवळ असलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांताने धावपळ सुरू केली. काहींनी देवळी तर काहींनी पुलगाव शहर गाठले. हा स्फोट लहान नाही तर यात अनेकजणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांच्या मनात चांगलीच धास्ती निर्माण झाली. प्रत्येकाच्या मनात ही घटना काय, ती कशी घडली याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
या भीषण घटनेची माहिती केंद्रासह राज्याच्या मंत्र्यांना कळताच त्यांनीही वर्धेकडे धाव घेतली. रुग्णालयाच्यावतीने या जखमींना पुरेपूर सेवा देण्याचे फर्मान सावंगी (मेघे) वैद्यकीय महाविद्यालयाचे कुलगुरू माजी खासदार दत्ता मेघे यांनी यांनी सोडले. शिवाय येथे जखमींना भेटण्याकरिता आलेल्या त्यांच्या नातलगांनाही त्रास होणार नाही याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या. या घटनेत मृत्यू झालेल्यांचा शोध घेण्याचे कार्य मंगळवारी रात्रीही सुरू असल्याचे दिसून आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
दिवसभर व्हॉट्स अॅपवर फोटोंची गर्दी
या घटनेची बातमी सकाळपासूनच अनेकांच्या व्हॉट्स अॅपवर फिरत होती. यात मृतकांची संख्या कमी अधिक होत असली तरी प्रत्येकाच्या तोंडून घटनेची भीषणता जाणवत होती. व्हॉट्सअॅपवरील काही छायाचित्रे फेक असल्याचेही अनेकांच्या बोलण्यावरून जाणवत होते.