मजुरांच्या घरवापसीसाठी जिल्हा प्रशासनाने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:08+5:30
घरवापसी कशी करता येईल यासाठी आता वर्धा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी परत जायचे आहे अशांनी संबंधित तहसीलदार तसेच कॅम्प इंचार्ज कडे अर्ज करावे. त्या अर्जावर वेळीच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मजुरांच्या घरवापसीसाठी जिल्हा प्रशासनाने कसली कंबर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना व लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात विविध निवारागृह आणि कॅम्पमध्ये सुमारे नऊ हजारांच्यावर परप्रांतीय अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या सुचनांना केंद्रस्थानी ठेऊन तसेच कोरोनाबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची दक्षता बाळगत त्यांची घरवापसी कशी करता येईल यासाठी आता वर्धा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी परत जायचे आहे अशांनी संबंधित तहसीलदार तसेच कॅम्प इंचार्ज कडे अर्ज करावे. त्या अर्जावर वेळीच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्तरप्रदेश, ओडीशा, आध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, झारखंड, जम्मू काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेले एकूण ८ हजार ६७ व्यक्ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊमुळे वर्धा जिल्ह्यात अडकलेले आहेत. याच व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी कसे पोहोचविता येईल यासाठी सध्या नियोजनबद्ध कार्यक्रम वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने आखल्या जात आहे. त्यासाठी इच्छुकांकडून तलाठ्यांमार्फत तहसीलदारांपर्यंत अर्ज मागविले जात आहेत. या अर्जात सदर व्यक्तीने त्याला कुठे जायचे आहे. यासह त्याचे वय, आधारकार्डचा क्रमांक, मोबाईल क्रमांक आदी खासगी माहिती नमुद करणे क्रमप्राप्त आहे. सदर अर्ज तहसीलदारांना प्राप्त होताच तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता केला जाणार आहे. त्यानंतर वर्ध्याचे जिल्हाधिकारी तसेच ज्या ठिकाणी सदर व्यक्तीला जायचे आहे, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा होत त्या व्यक्तीची घर वापसी केली जाणार आहे.
विशेष प्रवाशी रेल्वे सोडण्याबाबत विचार
राची, जयपूर, हैद्राबाद, चन्नई, उदयपूर, पाटणा, मुलगसराय, लखनऊच्या दिशेने विशेष रेल्वे गाड्या सोडण्यावर विचार होत आहे. परंतु, या विशेष रेल्वे गाड्या नेमक्या केव्हा सोडल्या जाणार आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. वर्धा जिल्हातील सुमारे २०० व्यक्ती लखनऊच्या दिशेने जाण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. ही माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांना पाठविली आहे. वर्धा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यानंतर योग्य निर्णय होत विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याची माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाकडून मुळ गावी जाणाºयांना भ्रमणध्वनीवरच देण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणी होणार
अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जावर काय कार्यवाही झाली याची माहिती सदर व्यक्तीने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर दिली जाणार आहे. यामुळे गर्दी टाळता येणार आहे. शिवाय अर्ज निकाली निघाल्यावर ज्या व्यक्तीला त्याच्या मुळ गावी पाठविले जाईल त्या व्यक्तीची पूर्वी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्याची घर वापसी केली जाणार आहे.
परप्रांतीयांसह इतर जिल्ह्यातील व्यक्तींची घर वापसी कशी करता येईल यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे. शिवाय कुठल्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे. इच्छुकांनी आपला अर्ज तहसीलदारांना किंवा कॅम्प इंचार्जला सादर करावा. अर्ज प्राप्त होताच योग्य कार्यवाही करण्यात येईल. शिवाय अर्जावर काय कार्यवाही झाली याची माहिती सदर व्यक्तीला अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर देण्यात येणार आहे.
- सुनील कोरडे, निवासी, उपजिल्हाधिकारी, वर्धा.