अंगणवाडी निवड समितीचा जिल्हा प्रशासनाला विसर
By Admin | Updated: May 13, 2014 00:03 IST2014-05-13T00:03:29+5:302014-05-13T00:03:29+5:30
शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात तसेच वस्ती-वाड्यांमध्ये अंगणवाडी केंद्र सुरू केले.

अंगणवाडी निवड समितीचा जिल्हा प्रशासनाला विसर
गौरव देशमुख - वायगाव (नि.) शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात तसेच वस्ती-वाड्यांमध्ये अंगणवाडी केंद्र सुरू केले. या अंगणवाड्यांत येणार्या बालकांना योग्य सुविधा देण्याकरिता नेमल्या जाणार्या अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. ही भरती प्रक्रिया राबविण्याकरिता एक समिती गठित केली जाते. जिल्ह्यात मात्र गत दोन वर्षांपासून ही अंगणवाडी निवड समितीच गठित करण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार या अंगणवाडी समितीचे गठण करावयाचे असते. पालकमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना कल्पना देऊन जिल्हाधिकार्यांच्या पुढाकाराने निवड समितीचे गठण करता येते. तसे करणे अनिवार्य आहे. या समितीचे गठण करण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली असली तरी समितीचे गठण झाले नाही. जाहिरात प्रसिद्ध केली, मग, समिती का गठित करण्यात आली नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे. समिती नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. अंगणवाडी सेविकांवर बालकांच्या आरोग्यासह गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यामुळे ही रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.