जिल्ह्यात २० हजार ८०८ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By Admin | Updated: March 1, 2016 01:24 IST2016-03-01T01:24:13+5:302016-03-01T01:24:13+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे.

जिल्ह्यात २० हजार ८०८ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
आठ तालुक्यात ७५ केंद्र : परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्याचे शिक्षण विभागापुढे आव्हान
वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा मंगळवार (दि.१ मार्च) पासून सुरू होत आहे. जिल्ह्यात ७५ केंद्रांवरून २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने पाच भरारी पथक तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
दहावीची परीक्षा ही जीवनातील पहिली महत्त्वाची परीक्षा आहे. याच परीक्षेतील गुणांवर पुढे कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावयाचा आहे हे विद्यार्थी ठरवित असतात. त्यामुळे दहावीची परीक्षा ही अत्यंत शांतापूर्ण मार्गाने पार पडावी, तसेच कुठेही कॉपीसारखा प्रकार घडू नये यासाठी पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील एकूण ७५ केंद्रावर २० हजार ८०८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. यामध्ये २० हजार ६८३ विद्यार्थी हे नियमित तर १२५ विद्यार्थी हे खासगीत परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने व कुठल्याही मोहाला बळी न पडता सदर परीक्षा द्यावी, कॉपीचा कसलाही आधार घेऊ नये यासाठी शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियानही राबविले जात आहे. परीक्षा केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी भरारी पथक सज्ज आहे. जिल्ह्यात दोन केंद्र संवेदनशील यादीत टाकण्यात आली आहे. यामध्ये यशवंत हायस्कूल वायगाव(नि), आणि यशवंत हायस्कूल सेलू या केंद्रांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
पाच भरारी पथके
परीक्षा केंद्रांवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, परीक्षा शांततापूर्ण वातावरणात व्हावी, कुण्याही विद्यार्थ्याने कॉपीच्या आहारी जाऊ नये व त्यांना कॉपी करण्यास कुणीही मदत करू नये यासाठी जिल्हा शिक्षण विभागामार्फत पाच भरावी पथके तैनात करण्यात आली आहे. एका पथकात सहा कर्मचारी अश्या प्रकारे ३० कर्मचारी ७५ केंद्रांवर नजर ठेवून असणार आहे.