मराठी व हिंदी अनुवादित कुराण शरीफ ग्रंथाचे वितरण
By Admin | Updated: April 23, 2015 01:51 IST2015-04-23T01:51:37+5:302015-04-23T01:51:37+5:30
सेक्युलर फ्रंटद्वारे कुराण शरीफ ग्रंथाचे हिंदी व मराठी अनुवाद वितरण कार्यक्रम घेण्यात आला़ अग्निहोत्री सभागृहात ...

मराठी व हिंदी अनुवादित कुराण शरीफ ग्रंथाचे वितरण
वर्धा : सेक्युलर फ्रंटद्वारे कुराण शरीफ ग्रंथाचे हिंदी व मराठी अनुवाद वितरण कार्यक्रम घेण्यात आला़ अग्निहोत्री सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरप्रसाद अग्निहोत्री तर अतिथी म्हणून हिंदी विद्यापीठाचे प्रतिकुलपती प्रा़ चित्तरंजन मिश्र, शेतकरी नेते विजय जावंधिया, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, मोहन अग्रवाल, ऩप़ शिक्षण सभापती डॉ. सिद्धार्थ बुटले, समता परिषदेचे रामभाऊ सातव, के. आर. बजाज, डॉ. पंकज मुरके, प्रदीप दाते, बाळा इंगोले, प्रा़डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. इमरान अली खान, सेक्यूलर फ्रंटचे संस्थापक सदस्य अॅड. असद खान पटेल, इमरान राही, अॅड. अभिजीत देशमुख, अॅड. जाहीद अली, जफर अली आदी उपस्थित होते.
जगातील प्रत्येक धर्मगं्रथ हा केवळ मानवतेची व शांती अहिंसेची शिकवण देणारा असतो; पण या ग्रंथाचे पठण, मनन व चिंतन न करता आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्याच्या नादात अनेक व्यक्ती विसंगतीपूर्व निवेदन व विचार समाजात पसरवतात. यामुळे सामाजिक सौहार्दाची भावना डळमळीत होते व अनेक जाती धर्मांत सामाजिक तेढ निर्माण होते. विद्यमान परिस्थितीत सर्वच धर्मगं्रथाचा सार जाणून घेतल्यास निश्चितपणे प्रत्येक जाती धर्मात बंधुभावाची भावना निर्माण होईल, असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अॅड. असद खान यांनी कुराण शरीफ हा मानवतेची शिक्षा देणारा ग्रंथ आहे, असे सांगितले़ प्रा़ मिश्र यांनी सर्व धर्माप्रती आदराची भावना असणे हे माणुसकीचे लक्षण आहे. शहरातील रस्ते लहान असतीलही; पण त्याचा वापर करणारी व्यक्ती मोठ्या मनाची असली तर रस्त्याचे लहानपण जाणवत नाही. विचारांची व्यापकता व परिपक्वता जनमानसात निर्माण करून खरा माणूस घडवण्याचे कार्य धर्मग्रंथांद्वारे होत असते, असे सांगितले़ जावंधिया यांनी आजचे राजकारण हे जाती, धर्मांत फुट पाडण्याचे एक साधन होऊ पाहत आहे. फोडा-झोडा आणि राज्य करा, हे धोरण राजकीय खेळी असून यापासून आपण सावध राहिले पाहिजे, असे सांगितले़
संचालन इमरान राही यांनी केले तर उपस्थितांचे आभार हनीफ शेख यांनी मानले. कार्यक्रमास होमगार्ड समादेशक मोहन गुजरकर, प्राचार्य प्रफूल दाते, जनाब जफर अली, अब्दुल गणी, अभिजीत रघुवंशी, विलास कुळकर्णी, प्रतापराज मासाळ, अशोक सावळकर, राजेश धोपटे, अहेसान राही, एस.आर. शेख, परमानंद थोटे, इरशाद अहमद, कन्नौजी, नौशाद खान पठाण, सुधीर इसासरे आदी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांना कुराण शरीफ ग्रंथाच्या मराठी व हिंदी अनुवादाच्या प्रती वितरित करण्यात आल्या. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली़(कार्यालय प्रतिनिधी)