जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण
By Admin | Updated: June 2, 2014 01:40 IST2014-06-02T01:40:40+5:302014-06-02T01:40:40+5:30
परिवहन विभागाच्या बसगाड्यांची दैनावस्था व मार्गावर असलेल्या बसच्या

जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण
वर्धा : परिवहन विभागाच्या बसगाड्यांची दैनावस्था व मार्गावर असलेल्या बसच्या कमी फेर्या यामुळे वर्धा-कापसी मार्गे राळेगाव या रस्त्यावर काळी-पिवळी व ऑटोरिक्षा चालकांना जोर आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती वाहतूक व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांना असून त्यांच्याकडून यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. वाहनात कोंबून प्रवासी भरण्याच्या या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा ते कापसी मार्गावर धावणार्या काळी-पिवळी चालकांनी नियम पुरते हद्दपार केले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक काळी-पिवळीमधून केली जाते. बसायला जागा असली तरी गाडीच्या पाठीमागे असलेल्या पायदानावर चार ते पाच प्रवासी उभे करून जीवघेणी प्रवासी वाहतूक केली जात आहे. याशिवाय ऑटोलाचकाच्या शेजारी बसवून प्रवाशांची जीवघेणी वाहतूक करण्याची शर्यत सध्या या मार्गावर सुरू आहे. तब्बल सात ते नऊ प्रवासी कोंबून धावणार्या ऑटोरिक्षा सर्रास दिसून येतात. या वाहनांकडे पाहिल्यावर यात बसणार्या प्रवाशांची कीव आल्याशिवाय राहत नाही. यातही या वाहनांची गती एवढी अधिक असते की समोरून येणार्या वाहन चालकाला त्याचा अंदाज येत नाही. यात अपघात होण्याची शक्यता अधिक आाहे. वर्धा-कापसी मार्गावर वायगाव येथील पोलीस चौकी सोडली तर समोर कुठेही पोलीस नसल्याने ही वाहतूक बिनदिक्कत चालत असल्याचे बोलले जात आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे या मार्गावरून आवागमन करणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत असताना याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)