जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या नवरगाववासीयांच्या व्यथा
By Admin | Updated: June 14, 2014 23:45 IST2014-06-14T23:45:37+5:302014-06-14T23:45:37+5:30
शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या नवरगाववासीयांच्या व्यथा
शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी
सेलू : शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले. त्यांनी जनतेत मिसळून त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. या निमित्त शासन आपल्या दारी अवतरल्याचा अनुभव गावकऱ्यांना आला.
जिल्हाधिकाऱ्यांसह व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी संयज भागवत, वर्धेचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक अधिकारी शरद करे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत तसेच सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, नायब तहसीलदार सुभाष यादव, अजय झिले व बोर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भिंगारे यांचा ताफा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गावात दाखल झाला. यावेळी गावातील सरपंच गिता कडूकर, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. नायब तहसीलदार सुभाष यादव यांनी या मागचा हेतू समजावून सांगितला. जिल्हाधिकारी सोना व सीईओ चौधरी यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनीही विविध समस्या पोटतिडकीने मांडून त्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सीईओ चौधरी यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती दिली. या योजनेचे कार्ड वाटप करण्याच्या सूचना संबंधीत ग्रामसेवकांना दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी आम आदमी विमा योजनेची माहिती देत अर्ज भरण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण लवकर होईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.(तालुका प्रतिनिधी)