कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गात असंतोष
By Admin | Updated: April 24, 2016 02:18 IST2016-04-24T02:18:31+5:302016-04-24T02:18:31+5:30
प्रतिनियुक्तीवरील पदांवर तदर्थ पदोन्नती कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदावनत करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गात असंतोष
जिल्हा कृषी अधीक्षकांना कृषी सेवा महासंघाद्वारे निवेदन : टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारा
वर्धा : प्रतिनियुक्तीवरील पदांवर तदर्थ पदोन्नती कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदावनत करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे २०-२५ वर्षानंतर पदोन्नती झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हणत त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्गाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय कृषी सेवा महासंघाने घेतलेला असून त्याबाबतचे निवेदन महासंघाच्या जिल्हा शाखेद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांना देण्यात आले.
कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहे, यामध्ये प्रामुख्याने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) ची पदे व्यापगत न करता या संस्थेचे बळकटीकरण करण्यात यावे. (वनामती नागपूर) स्तरावरील संचालक-चार पदे, उपसंचालक (अकृअ संवर्ग) आठ पदे तसेच जिल्हास्तरावरील प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय कायम ठेवून प्रकल्प संचालक (अकृअ संवर्ग) ३३ पदे, प्रकल्प उपसंचालक ६६ इत्यादी प्रतिनियुक्तीची पदे कायम करण्यात यावीत.
कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या वनामती (समिती) नागपूर व संलग्न ८ समिती वा प्रशिक्षण संस्था सामान्य प्रशासन विभागाकडे हस्तांतरीत न करता या संस्था कृषी विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणात आणव्यात. या संस्थामधील प्रतिनियुक्तीची पदे तदर्थ पदोन्नतीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून भरण्यात यावी. कृषिमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी. नाशिक संभाग व अन्य संभागातील कृषी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे कृषी पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदांवर पदोन्नती देणेबाबत विभागीय कृषी सहसंचालन यांना आदेश व्हावेत. कृषी अधिकारी (मकृसे गट-ब कनिष्ठ) संवर्गातील ३५३ रिक्त पदे कृषी पर्यवेक्षक संवर्गातून पदोन्नतीने भरण्याची प्रलंबित प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी.
बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांचा सुधारित आकृतिबंध शासननिर्णय ३० जून २०१५ अन्वये व्यपगत केलेली मकृसे गट-अ संवर्गातील-३ पदे, कृषी अधिकारी (मकृसे गट-ब कनिष्ठ) संवर्गातील-१६५ पदे, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील - ८ पदे पुनर्जीवित करण्यात यावी आणि सदर पदे कृषी विभागातून तदर्थ पदोन्नतीद्वारे भरण्यात यावीत.
कृषी विभागातील मंजूर आकृतिबंधाव्यतिरिक्त अन्य योजनेतील यंत्रणेतील विभागातील मंजूर प्रतिनियुक्तीची पदे तदर्थ पदोन्नती कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून कायमस्वरूपी भरण्यात यावी, जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यासाठी स्वतंत्र पदे मंजूर करण्यात यावी अन्यथा या योजनेचा प्रगती अहवाल सादर करण्याचे काम अन्य विभागास सोपविण्यात यावे. तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची समकक्षता पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व दर्जाशी समकक्ष करण्यात येऊन मकृसे वर्ग-२ संवर्गास वर्ग-१ राजपत्रित दर्जा व कृषी अधिकारी मकृसे (गट-ब कनिष्ठ) संवर्गास नियमित वर्ग-२ राजपत्रित दर्जा देण्यात यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याची जबाबदारी तलाठ्यांची असल्याने यात कृषी सहायकास जबाबदार धरले जाऊ नये. जलसंधारण आयुक्तालय औरंगाबादचे प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण कृषी विभागाकडे देणे. कृषी विभागाच्या काही योजना जि.प.कडे हस्तांतरीत करण्याबाबतचा निर्णय रद्द करणे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. शिष्टमंडळात तालुका कृषी अधिकारी ब्राह्मणे, कृषी अधिकारी शेळके, सूर्यकांत चौधरी, कृषी उपसंचालक जी.आर. कापसे, तंत्र अधिकारी राजेश चनशेट्टी, राधिका बैरागी, मयुरी झोरे, मेघा पाटील, तालुका कृषी अधिकरी राठोड उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)