एसडीओ कार्यालयात तोडफोड
By Admin | Updated: June 16, 2015 02:23 IST2015-06-16T02:23:29+5:302015-06-16T02:23:29+5:30
जात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत येथील एका ग्रामदूत

एसडीओ कार्यालयात तोडफोड
जात प्रमाणपत्रावर स्वाक्षरीकरिता ग्रामदूत केंद्राच्या कर्मचाऱ्याचा धिंगाणा
वर्धा: जात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास उपविभागीय अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत येथील एका ग्रामदूत केंद्राच्या कर्मचाऱ्याने कार्यालयात येत तोडफोड केली. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली असून तोडफोड करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे; मात्र आवश्यक असलेली तक्रार आली नसल्याने वृत्त लिहिस्तोवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
प्राप्तमाहितीनुसार, येथील ग्रामदूत केंद्रातील एक कर्मचारी गत काही दिवसांपासून उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे जात प्रमाणपत्राचे प्रकरण घेवून येत त्यावर स्वाक्षरी करण्याचा तगादा लावत होता. त्याने सादर केलेल्या प्रकरणात त्रुट्या असल्याचे कारण काढत एसडीओ पाटील यांच्याकडून त्याच्या प्रकरणावर स्वाक्षरी करण्यात येत नव्हती. यामुळे संतापलेल्या शुभम जळगावकर नामक युवकाने गत आठवड्यात सदर अधिकाऱ्याशी हुज्जत घातली होती. आज पुन्हा सदर युवक प्रमाणपत्राचे प्रकरण घेवून कार्यालयात गेला असता पाटील यांनी त्याला तुझ्या प्रकरणात त्रुट्या असल्याचे म्हणत परत जाण्यास सांगितले. यामुळे संतापलेल्या सदर युवकाने व त्याच्या काही सहकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात धिंगाणा घातला. यात त्यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या कक्षाची तोडफोड करण्यात आली. सदर युवक तोडफोड करीत असताना त्याची माहिती वर्धा पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक रामटके यांनी कार्यालय गाठत या युवकासह त्याच्या काही साथीदारांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्याकडून आवश्यक तक्रार आली नसल्याने प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे ठाणेदार बुराडे यांनी सांगितले. योग्य तक्रार करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.(प्रतिनिधी)
शुभम जळगावकर नामक युवक कार्यालयात बनावट प्रकरणे घेवून येतो. शिवाय तो थेट कक्षात येवून त्याच्याकडे असलेल्या प्रकरणावर स्वाक्षरी करण्याकरिता तगादा लावत आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला आहे. यापूर्वी त्याला समज देण्यात आली होती. आज तर त्याने कार्यालयात येत तोडफोड केली. प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
- स्मिता पाटील, उपविभागीय अधिकारी, वर्धा