सामान्य सदस्यांची अवहेलना
By Admin | Updated: September 18, 2016 00:59 IST2016-09-18T00:59:00+5:302016-09-18T00:59:00+5:30
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची आमसभा नुकतीच पार पडली. यात मोजक्या सदस्यांना संघटनेने कोणत्या क्षेत्रात काम करावे याबाबत

सामान्य सदस्यांची अवहेलना
सेवानिवृत्तांची आमसभा : मोजक्या सदस्यांचेच ठराव मंजूर
रोहणा : सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची आमसभा नुकतीच पार पडली. यात मोजक्या सदस्यांना संघटनेने कोणत्या क्षेत्रात काम करावे याबाबत विधायक सूचनावजा ठराव मांडायचे होते. काही सदस्यांनी तोंडी तथा लेखी सूचना व्यासपीठावरील मान्यवरांकडे तालुका संघटकांमार्फत पाठविल्या; पण अध्यक्षांनी सामान्य सदस्यांना ठराव मांडण्यास आमसभा संपेपर्यंतही संधीच दिली नाही. यामुळे सामान्य सदस्यांची अवहेलना केल्याचा आरोप होत आहे.
वर्धा येथील एका सभागृहात रविवारी केंद्र तथा राज्य सरकारी व बिनसरकारी तसेच लोकल बॉडीज सेवानिवृत्त कर्मचारी वेलफेअर संघटनेची वार्षीक आमसभा अध्यक्ष अरविंद गौरशेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत पार पडली. जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर दोन-तीन सामान्य सदस्यांनी आमसभेत संघटनेने कोणत्या क्षेत्रात काम करायला पाहिजे, याबाबत सूचना करून ठराव पारित करावे, अशा मानसिकतेतून काही बोलायचे आहे, अशी इच्छा प्रदर्शीत केली. व्यासपीठावरील संघटनेच्या मान्यवरांकडे लेखी संदेश तालुका संघटकांमार्फत पाठविले. आमसभा संपण्यापूर्वी संधी दिली जाईल, अशी अपेक्षा सामान्य सदस्यांना होती; पण सभा संपली तरी सदर सदस्यांना संधीच दिली नाही.
वर्षभरात संघटनेने काय काम केले, याचा आढावा अध्यक्षांना मांडायचा होता; पण प्रकृती स्वास्थाच्या कारणांनी त्यांनी तो अहवाल लेखी स्वरूपात सभासदांना वितरित केला. सर्वच सदस्य सुशिक्षीत असल्याने त्यांनी तो वाचला; पण सभेत एका संचालकाने त्या अहवालाचे पुन्हा वाचन करीत वेळ खर्ची घातला. आमसभेत भरगच्च कामकाजामुळे सामान्य सदस्यांना संधी देता आली नाही, असा देखावा करीत त्यांचा आवाज दाबण्याचा अनूचित प्रयत्न संघटनेचे अध्यक्ष व मान्यवरांनी केला.
वास्तविक, समाजाला योग्य दिशा देण्याची क्षमता व जीवनातील उन्हाळ्यात पावसाळ्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सेवानिवृत्तांच्या संघटनेच्या नेत्यांनी आमचेच ऐका, हा संकुचित दृष्टीकोन सोडणे गरजेचे आहे. इतरांनी काही सांगावे, आम्ही ऐकतो, हा विशाल दृष्टीकोण बाळगून इच्छुकांना संधी देणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. यामुळे काही सर्वसामान्य सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.(वार्ताहर)