उड्डाणपुलाच्या विलंबाबाबत नाराजी
By Admin | Updated: November 20, 2015 02:37 IST2015-11-20T02:37:25+5:302015-11-20T02:37:25+5:30
सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला विलंब होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रोष व्यक्त होत आहे.

उड्डाणपुलाच्या विलंबाबाबत नाराजी
खासदारांची रेल्वे महाप्रबंधकांशी चर्चा : गाड्यांच्या थांब्याबाबत केली विचारणा
वर्धा : सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला विलंब होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रोष व्यक्त होत आहे. पुलाच्या विलंबाबाबत खासदार रामदास तडस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे महाप्रबंधकाशी मुंबई येथील कार्यालयात चर्चा केली. यावेळी गाड्यांच्या प्रस्तावित थांब्याबाबतही विचारणा केली.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाशी निगडित विविध मागण्या तसेच प्रलंबित कार्याला गती देण्याबाबत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्या उपस्थितीत खा. तडस यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खा. तडस यांनी सिंदी (रेल्वे) येथील उड्डाणपूल निर्मितीच्या कार्याला होत असलेल्या विलंबाबाबत सविस्तर चर्चा करून जाहीर नाराजी व्यक्त केली. यानंतर हैदराबादवरून दिल्लीला जाणारी एपी एक्स्प्रेसला (तेलंगणा) सेवाग्राम रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, ही अनेक दिवसांपासून सुरू असलेली मागणी प्रलंबित असल्याचे सांगत मागणीचे निवेदन दिले. पोरबंदर येथून हावडा येथे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा. तो वर्धा रेल्वे स्थानकावर दिल्यास पोरबंदर व सेवाग्राम या दोन ऐतिहासिक शहरांचा संबंध जुळणार असल्याचे सांगितले. पोरबंदर एक्स्प्रेस नागपूर येथेच थांबत असल्याने सेवाग्राम आश्रमामध्ये येण्याकरिता पर्यटकांना त्रास होतो. तो कमी करण्याकरिता हा थांबा देण्याची मागणी केली.
विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जबलपूर- अमरावती एक्स्प्रेसला सिंदीप्रमाणेच चांदूर (रेल्वे) येथे थांबा द्यावा, अशी मागणी केली. गुजरात, आंध्रप्रदेश व विविध राज्यांत जाणाऱ्या गाड्यांना थांबे नसल्याने सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, सिंदी रेल्वे, हिंगणघाट येथील प्रवासी, व्यापाऱ्यांची गैरसोय होते. ती टाळण्यास्तव थांबे देण्याची मागणी केली. प्रबंधकांनी सकारात्मक उत्तर देत त्या लवकरच पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.(कार्यालय प्रतिनिधी)