दवाखाना सुरु; पण सहायक आयुक्त बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:26+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी आष्टी व समुद्रपूर तालुका वगळता इतर सहा तालुक्यामध्ये तालुका पशुचिकित्सालय आहेत. यापैकी देवळी व कारंजा (घा.) येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त लॉकडाऊनपासून कार्यालयात फिरकलेच नसल्याचे पशुपालकांकडून सांगितले जात आहे.

दवाखाना सुरु; पण सहायक आयुक्त बेपत्ता
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. तरीही राज्यस्तरीय तालुका पशू चिकित्सालयातील काही सहाय्यक आयुक्तांनी आदेशाला केराची टोपली दाखवित लॉकडाऊनपासून कार्यालयाचे तोंडही पाहिले नाही. परिणामी सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून कामाचा भार वाहिला जात असल्याची पशुपालकांकडून ओरड होत आहे.
जिल्ह्यामध्ये पशूधनाची मोठी संख्या असून मोठा ढोल पिटत पहिल्यांदाच ऑनलाईनपद्धतीने टॅबव्दारे विसावी पशूगणना झाली मात्र, जिल्हा आणि तालुकास्तरीय आकडेवारी अद्याप गुलदस्त्यात असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अशातच या लॉकडाऊनच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी आष्टी व समुद्रपूर तालुका वगळता इतर सहा तालुक्यामध्ये तालुका पशुचिकित्सालय आहेत. यापैकी देवळी व कारंजा (घा.) येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त लॉकडाऊनपासून कार्यालयात फिरकलेच नसल्याचे पशुपालकांकडून सांगितले जात आहे. देवळी येथील सहाय्यक आयुक्त डॉ. सुहास अलोने हे यवतमाळ तर कारंजा (घा.) येथील सहाय्यक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे नागपुरात वास्तव्यास असतात.
कोरोनामुळे जिल्ह्याच्या सीमाबंद असल्याने हे दोन्ही अधिकारी स्वगृही लॉकडाऊन झाले आहेत. शिवाय कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने कार्यालयातील कामकाजाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून मुख्यालयी न राहणाºया या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई होणार का? असा प्रश्न देवळी व कारंजा (घा.) तालुक्यातील पशुपालकांनी उपस्थित केला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टी
कांरजा येथील सहाय्यक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे लॉकडाऊनपासून कार्यालयात आले नसल्याचे स्थानिक पशुपालकांकडून सांगण्यात आले. मात्र सध्या कार्यरत असलेल्या डॉ.घुमडे यांना विचारले असता ते महिन्याभरापासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यापूर्वी ते कर्तव्यावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यात कुठे तरी पाणी मुरताना दिसून येत आहे.
देवळी येथील सहाय्यक आयुक्त डॉ. सुहास अलोने हे सुद्धा लॉकडाऊनपासून कार्यालयात आले नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. किशोर कुमरे यांना विचारले असता त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.त्यामुळे या अधिकाºयांवर वरिष्ठांचीही कृपादृष्टी असल्याचे दिसून येत आहे.
कारंजा येथील सहाय्यक आयुक्त डॉ.खंडारे यांच्या रजेचा अर्ज ऑनलाईन प्राप्त झाला पण, त्याची तारीख मला माहिती नाही. डॉ. अलोणे यांच्याबद्दल जिल्हा उपायुक्तांकडून किंवा त्यांच्या स्वत: कडून कोणती माहिती मिळाली नाही. सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा उपायुक्तांना आहे.
डॉ. किशोर कुमरे, सहआयुक्त, प्रादेशिक पशुसंवर्धन विभाग, नागपूर