पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था
By Admin | Updated: July 26, 2015 00:27 IST2015-07-26T00:24:06+5:302015-07-26T00:27:28+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक...

पालिकेच्या दुर्लक्षामुळे चौकांत अव्यवस्था
पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा : तीन चौक सुटसुटीत तर चार ठिकाणी वाहतुकीची कोंडी
वर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखणे, त्यात आणखी भर घालणे, शहाराला बकाल स्परूप येण्यापासून रोखणे आदी कामे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पालिकेला करावी लागतात; पण वर्धा शहरात यासाठी प्रयत्नच होताना दिसत नाही. यामुळेच शहरातील काही चौक सुटसुटीत तर काही चौकांना बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून शहराचे विद्रुपिकरणच होत असल्याचे दिसते.
शहरातील बसस्थानक ते विश्राम गृह दरम्यान नेताची चौक, डॉ. आंबडेकर चौक आणि बापूराव देशमुख चौक आहे. यातील डॉ. आंबेडकर चौक सुटसुटीत आणि वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे; पण नेताजी चौक आणि देशमुख चौकात व्यवस्थेचा अभावच आढळून येतो. नेताजी चौकात आॅटो तसेच अन्य वाहनांनी अतिक्रमण केले असून दुकानेही थाटली गेली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही नेहमी दुर्लक्षित राहत असल्याचे दिसते. जि.प. इमारतीसमोर असलेल्या स्व. बापूराव देशमुख यांच्या पुतळ्याकडेही दुर्लक्षच होताना दिसते. या चौकात वाहतुकीची तितकीशी समस्या निर्माण होत नसली तरी हा पुतळा प्रेमी युगलांचा ठिय्या असल्याचे दिसते. महाविद्यालयीन युवक युवती येथे तासनतास बसून असतात.
यानंतर महात्मा गांधी चौक सुटसुटीत असून वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे. वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, बजाज चौक आणि डॉ. आंबेडकर चौक हे तीनच चौक वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहेत. अन्य चौकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. शहरातील महत्त्वाचा आणि सतत वर्दळ असलेला दादाजी धुनिवाले चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे.
वर्धा ते नागपूर मार्गावरील या चौकातून बॅचलर रोडवर जाण्याकरिता बाहेरील रस्ता आहे; पण सध्या या मार्गावरही वस्ती, महाविद्यालये झाल्याने रहदारी वाढली आहे. शिवाय चौकातच पेट्रोल पंप, रस्त्याच्या कडेला पानटपऱ्या आणि भाजीची दुकाने लावण्यात आली आहेत. यामुळे रहदारीच अडचणीत आल्याचे चित्र आहे. दादाजी धुनिवाले देवस्थान परिसरात नेहमीच वाहनांच्या रांगा लागतात. शिवाय वाहने रहिवाशी भागात वळविताना अपघाताचा धोका असतो.
या चौकात बसेस तसेच ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. प्रवासी निवारा चौकापासून काही अंतरावर असताना प्रवासी चौकातच उभे राहतात. यामुळे बसेस व ट्रॅव्हल्सही तेथेच थांबतात. मोठी वाहने रस्त्यावर उभी झाली की समोरून येणारी वाहने दिसत नाहीत आणि अपघात होतात. या चौकात अनेक मोठे अपघात झाले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)