तालुक्यातील सात सेवा सहकारी संस्थांवर बरखास्तीची कारवाई
By Admin | Updated: May 8, 2015 01:47 IST2015-05-08T01:47:54+5:302015-05-08T01:47:54+5:30
तालुक्यातील आंजी (बऱ्हाणपूर), आकोली, चोंढी, हिवरा (कावरे), शिरपूर, वाटखेडा, फत्तेपूर या सात गावातील सेवा सहकारी संस्थाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले.

तालुक्यातील सात सेवा सहकारी संस्थांवर बरखास्तीची कारवाई
देवळी : तालुक्यातील आंजी (बऱ्हाणपूर), आकोली, चोंढी, हिवरा (कावरे), शिरपूर, वाटखेडा, फत्तेपूर या सात गावातील सेवा सहकारी संस्थाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. को-आॅपरेटीव्ह बँकेचे संचालक बहुमताने थकबाकीदार ठरल्यामुळे त्यांच्यावर तालुका उपनिबंधक एस.पी. गुधाणे यांनी कारवाई केली. थकबाकीदार असलेले या गावातील ७९ व उर्वरित गावातील ४७ असे एकूण १२८ संचालक, आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत.
पुलगाव- देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक उंबरठ्यावर आहे. त्यातच बँकेचे थकीतदार ठरलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांवर कारवाई करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. या निवडणुकीच्या मतदारांची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून निवडणूक कार्यक्रमाकडे सर्व राजकीय पक्षांचे डोळे लागले आहे. या बाजार समितीसाठी १९ जणांचे संचालक मंडळ निवडून द्यावयाचे आहे. यामध्ये सेवा सहकारी मतदार संघातून ११, ग्रा.प. मतदार संघातून चार तसेच हमाल व मापारी मतदारसंघात चार उमेदवारांचा समावेश राहणार आहे.
या आधी सेवा सहकारी मतदार संघात तालुक्यातील ४९ सहकारी संस्थाचे ५९३ संचालक मतदान करीत होते; आजस्थितीत वेगवेगळ्या कारणांनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे. मतदारांची संख्या ४०० पर्यंत घसरल्यामुळे अपेक्षीत राजकीय गटांची दाणादाण उडाली आहे. बाजार समितीच्या ग्रा.पं. मतदार संघात ४८२ मतदार असून चार संचालक निवडून द्यावयाचे आहे. हमाल व मापारी मतदार संघात ४६ मतदार असून येथूनही चार संचालक निवडून द्यावयाचे आहे. बाजार समितीची निवडणूक काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व सहकारचे प्रा.सुरेश देशमुख या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व ग्रा.पं. मतदार संघावर आ. कांबळे यांचा वरचश्मा असला तरी निवडणुकीतील चित्र काय राहतील, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)