दुभाजक सौंदर्यीकरणाचेच विद्रुपीकरण
By Admin | Updated: March 12, 2015 01:36 IST2015-03-12T01:36:02+5:302015-03-12T01:36:02+5:30
शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौदर्यीकरण करण्याची योजना तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात आखण्यात आली.

दुभाजक सौंदर्यीकरणाचेच विद्रुपीकरण
वर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौदर्यीकरण करण्याची योजना तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आले. सिमेंटचे आकर्षक टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच जाहिराती लावण्याचीही सोय करण्यात आली. परंतु सध्या यातील बरीच झाडे वाळून केवळ माती उरली आहे. त्यामुळे हे सौंदर्यीकरणच शहरासाठी विद्रुपीकरण ठरत आहे.
सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने इतर चौकात नंतर असेच सौंदर्यीकरण केले जाणार होते. परंतु नवनिर्वाचित नगराध्यक्ष याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या दुभाजकाची स्थिती अधीकच वाईट झाली आहे. शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर छोटे छोटे चौक असून दोन्ही बाजूला असलेल्या मार्केटमध्ये जाणे सोयीस्कर होते. मुख्य मार्ग असल्याने तो आकर्षक आणि हिरवळीचा असावा अशी शहरवासीयांची स्वाभाविक इच्छा आहे. यासाठी म्हणून काही वर्षापूर्वी दुभाजकांवर लोखंडी कठडे बसवून झाडे लावण्यात आली. पण यातील झाडांकडे लक्ष न दिल्याने दुभाजकांवर रान तयार झाले. तसेच कठडेही अपघातांमुळे तुटून बाहेरच्या बाजूला वाकले. त्यामुळे अपघातही वाढले. मोठ्या झाडांच्या सावलीत मोकाट जनावरे बसण्याचा प्रकार सुरू झाला. आजही हा प्रकार सुरू आहे.
या सर्व बाबींना आळा बसावा यासाठी म्हणून नगरपालिकेच्या वतीने तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात दुभाजक सौदर्यीकरणाचे एक नये रोल मॉडेल तयार करण्यात आले. याचा डेमो सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आला. दुभाजकांवर त्रिकोणी आकाराचे सिमेंटचे टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच त्यावर छोटे बॅनर लावण्याची सोयही करण्यात आली. नगर परिषदेच्या योजना तिथे बॅनरच्या सहाय्याने लावण्यात आल्या. पुढे जाऊन असेच सौदर्यीकरण इतरही चौकातील दुभाजकांवर सामाजिक संस्था आणि इतर व्यावसायिकांच्या मदतीने करण्याचा मानस होता. येथे आपल्या जाहिराती लावण्याची मुभा देण्यात येणार होती. पालिकेचे उत्पन्न वाढावे हा यामागील मानस होता. पण सध्या या सौदर्यीकरणाचेच तीनतेरा वाजले आहे.
सध्या या टाक्यांमधील बरीच झाडे वाळली असून त्यात केवळ माती उरली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरातील कागदाचा कचरा, प्लास्टिक पाणी पाऊच, खर्रा पन्नी, गुटखा पुड्या अशा प्रकारचा कचरा या कुंड्यांमध्ये आढळून येतो. नवे नगराध्यक्ष याकडे लक्षच द्यायला तयार नसल्याने विदृपीकरण वाढत आहेत. यामुळे दुभाजक सौंदर्यीकरणाचे ‘रोल मॉडेल’ केवळ ‘मॉडेल’ पुरतेच उरल्याचा प्रत्यय येत आहे.(शहर प्रतिनिधी)