धंतोलीतील हॉटेल शिव मध्ये अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:37 IST2017-11-06T23:36:36+5:302017-11-06T23:37:00+5:30
निक धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव मध्ये अस्वच्छतेचा चांगलाच कळस असल्याचे दिसून आले.

धंतोलीतील हॉटेल शिव मध्ये अस्वच्छता
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव मध्ये अस्वच्छतेचा चांगलाच कळस असल्याचे दिसून आले. या हॉटेलात उघड्यावर अन्नासह सर्वत्र शिळे अन्न उघड्यावर असल्याचे दिसून आले. यामुळे पालिकेच्या पथकाने या हॉटेल मालकांना खडसावत हॉटेलात स्वच्छता राखण्याची तंबी दिली. ही कारवाईची पहिली वेळ असल्याने केवळ ५ हजार रुपयांचा दंड ठोठावून पुढे अशी हयगय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना हॉटेल व्यावसायिक किशोर धांदे याला केल्या.
स्थानिक धंतोली भागातील हॉटेल शिव येथे शहरातील नागरिक गरम अल्पोहाराकरिता येतात. येथे सकाळच्या वेळी चांगलीच गर्दी असते. मात्र हॉटेलातील अस्वच्छतेबाबत ग्राहक नाराज होते. याची माहिती कुण्या जागरूक नागरिकाने पालिकेला दिली. यावरून पालिकेच्या विशेष पथकाने आज सायंकाळी या हॉटेलात धाड घातली. या धाडीत हॉटेलातील अस्वचछता पाहून पथकातील अधिकारी आणि कर्मचारी अवाक् झाले. या संदर्भात हॉटेल मालकाला विचारणा केली असता त्याच्याकडून चालढकलीचे उत्तर मिळाले. यामुळे हॉटेलमालक नागरिकांच्या आरोग्याबाबत सजग नसल्याचे दिसले.
यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत हॉटेलमध्ये स्वच्छतेबाबत कुठल्याही उपाययोजना नसल्याचे दिसून आले. सर्व खाद्यपदार्थ उघड्यावरच तयार केल्या जात असल्याचे कारवाई दरम्यान पुढे आले. यामुळे पालिका कर्मचाºयांनी सदर हॉटेलच्या मालकाला दंड ठोठावला. सदर व्यावसायिकाकडे न.प.चे नाहरकत प्रमाणपत्रही नसल्याचे दिसून आले. शिवाय हॉटेलमधील उरलेले अन्न सदर व्यावसायिक थेट नालीमध्ये टाकत असल्याचे आढळून आले. हॉटेलच्या परिसरात असलेली अस्वच्छता व त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत पथकाच्यावतीने दंडात्मक कारवाई केली.
ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात प्रवीण बोरकर, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्रेहा मेश्राम, नवीन गोन्नाडे, गुरूदेव हटवार, लंकेश गोडेकर, सतीश पडोळे यांनी केली.
अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील नामांकित असलेल्या हॉटेलात अन्न व औषधी औषधी प्रशासनाच्या अधिकाºयांनी कधी चौकशी केली नाही. पालिकेच्या चौकशीत येथील अस्वच्छतेचा प्रकार उघड झाला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागाने येथे कार्यवाही करणे गरजेची असल्याचे नागरिक यावेळी बोलताना दिसले.
धंतोली चौकातील हॉटेल शिवमध्ये अस्वच्छतेचा कळस दिसून आला. येथील कारागिर अस्वचछ कपड्यात होते. शिवाय पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कारवाई केली.
- अशोक ठाकूर, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, वर्धा.