अतिपावसामुळे पिकांवर रोग
By Admin | Updated: August 12, 2016 01:45 IST2016-08-12T01:45:35+5:302016-08-12T01:45:35+5:30
संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे.

अतिपावसामुळे पिकांवर रोग
शेतकरी हवालदिल : तूर करपली तर कपाशी पडली पिवळी
कारंजा (घा.) : संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे. सोयाबीनवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. यामुळे पिके हातात येणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदाही नापिकीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, भूईमुंग, मुंग आदी पिकांची पेरणी केली. होता नव्हता पैसा लावला. पावसाने चांगली सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला होता. पेरणी साधली. यंदा सुगीचे दिवस येतील, अशी स्वप्ने पाहत असतानाच संततधार पावसाला सुरूवात झाली. ८ जूनला सुरू झालेला पाऊस वाढत गेला. ४ आॅगस्टपर्यंत तालुक्यात एकूण ६१५.२ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ ४३१.४ मिमी पावसाची नोंद होती. गतवर्षी तालुक्यात ९०० किमी एकूण पाऊस झाला. त्या तुलनेत यंदा दोन महिन्यांतच ७० टक्के पाऊस झाला. पावसाचे आॅगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक आहेत. या महिन्यांत पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे मत पर्जन्यमान विभागाने व्यक्त केले आहे.
सततच्या पावसामुळे पाणी साचून जमिनीतील हवेचे प्रमाण कमी झाले. यामुळे पिकांवर अनेक रोगांचे आक्रमण होत आहे. सोयाबीनच्या पानांवर रोग आला. तूर करपली. कपाशीची पाने पिवळी पडली आहे. पिकाची वाढ खुंटली आहे. सततच्या पावसामुळे आंतर मशागत करता आली नाही. तण वाढले. निंदणाची कामे खोंळंबली. निंदणाची मजुरीही वाढली. तननाशकही अति पावसामुळे निष्प्रभावी ठरले. एकंदरीत अती पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षी अवृष्टी तर यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावे लागणार, असे दिसते.
तालुक्यात यावर्षी सर्वाधिक ४६ हजार ४१७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांनी लागवडीखाली आणली. चांगले उत्पादन येईल या आशेने शेतकरी अत्यंत परिश्रम घेत आहेत; पण संततधार पावसामुळे मेहनत व्यर्थ ठरणार असल्याचेच चित्र आहे. आणखी काही दिवस पावसाचे सातत्य कायम राहिले तर पिकांना वाचविणे कठीण होणार आहे. यामुळे उपाययोजना सूचविणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)