तूर पिकावर मर रोग; वेळीच उपाययोजना करणे गरजेचे
By Admin | Updated: August 1, 2016 00:39 IST2016-08-01T00:39:16+5:302016-08-01T00:39:16+5:30
तूर हे राज्यातील महत्वाच्या कडधान्यापैकी एक आहे. सध्या तूर व तूर डाळीचे भाव पाहता एकेकाळी दुय्यम असलेले

तूर पिकावर मर रोग; वेळीच उपाययोजना करणे गरजेचे
कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा : खतांच्या फवारणी आणि निगराणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वर्धा : तूर हे राज्यातील महत्वाच्या कडधान्यापैकी एक आहे. सध्या तूर व तूर डाळीचे भाव पाहता एकेकाळी दुय्यम असलेले तूर पीक महत्त्वाचे मुख्य नगदी पीक म्हणून समोर आले आहे. मागील हंगामाचा विचार करता तूर पिकाने शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तारले. या पिकाचा लागवड खर्च अत्यल्प व बाजारभाव अधिक असल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर पिकाला प्राधान्य दिले. सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. या पिकाचे वेळीच व्यवस्थापन केल्यास ते वाचविता येऊ शकते, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी दिला आहे.
मागील आठवड्यात जि.प. कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी दिल्या. यात संततधार पावसामुळे तूर पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. यात बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया न करता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकावर तसेच पानबसन जमिनीवरील तूर पिकावर अधिक प्रमाणात मर रोग आढळून आला. मर रोग हा तूर पिकासाठी घातक आहे. हा रोग जमिनीतून उद्भवतो. मागील पिकाचे अवशेषामध्ये बुरशीचे वास्तव्य असल्यास पुढील वर्षीच्या तूर पिकात हा रोग येतो. हा रोग मुख्यत: पीक रोप अवस्थेत, फुलोऱ्यावर असताना तसेच शेंगा धरण्याच्या कालावधीत आढळतो. फुलोरा व शेंगा धरण्याच्या कालावधीत रोगाची लागण झाल्यास काही वेळा १०० टक्केपर्यंत नुकसान होते. फ्युजारियम आॅक्झीस्पोरम (उडम) या बुरशीमुळे हा रोग होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुलूल होतात. पिकास पाणी देऊनही पाण्याचे वहन या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडांच्या वरच्या भागात पाणी पोहोचत नाही. यामुळे पाने पिवळी पडतात व नंतर झाड मरते. झाडाची मूळे उपटून पाहिल्यास ते इतर सशक्त झाडांप्रमाणेच असतात; पण त्याचा उभा काप घेतल्यास त्यात मुळाचे झायलम-उती काळी पडलेली दिसते. एका वर्षात ही बुरशी २७५ सेंमीपर्यंत जमिनीत पसरते व ३ ते ८ वर्षेपर्यंत पीक नसताना पिकाच्या अवशेषामध्ये वास्तव्य करू शकते. यामुळे तुरीचे पीक वारंवार एका ठिकाणी घेतल्यास रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. काही विशिष्ट ठिकाणी मर रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. यावरून तेथे बुरशीची संख्या अधिक असल्याचे समजावे. या बुरशीजन्य मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी वेळीच उपाययोजना करणे तथा रोगाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही केंद्राद्वारे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)
रोग आढळताच डवरणी तसेच बुरशीनाशकाची ड्रेचिंग गरजेची
पिकांची फेरपालट करणे, तुरीनंतर ज्वारी पिकाची फेरपालट वा ज्वारीचे आंतरिक फायदेशिर आढळून येते. उन्हाळ्यात खोल नांगरटी करावी. मर रोगाची लागण झाल्यास त्वरित डवरणी करणे गरजेचे आहे. डवरणी केल्यास जमिनीमध्ये हवा खेळती ठेवता येते. कॉपर आॅक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून तूर पिकाच्या बुडाशी ड्रेंचिग करावे. या उपाययोजना केल्यास मर रोगावर नियंत्रण मिळविता येते.
तूर पिकावर येणारा दुसरा रोग म्हणजे खोडावरील करपा होय. यामध्ये कोलोटोट्रिकम या बुरशीमुळे खोडावर तसेच फांद्यांवर काळ्या करड्या रंगाचे डाग पडतात व पीक करपल्यासारखे दिसते. या रोगाची तिव्रता अधिक असल्यास झाडे वाळतात. या रोगाच्या व्यवस्थापनेसाठी रोगट झाडांना उपटून जाळणे गरजेचे असते. मॅन्कोझेब हे बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे गरजेचे असते.
फायटोप्थोरा करपा हा रोग फायटोप्थोरा बुरशीमुळे होतो. अधिक व संततधार पाऊस या बुरशीला पोषक असतो. ८० टक्के आर्द्रता व २२- २५ सेमी तापमान रोग वाढण्याचे कारण ठरते. यामुळे पानावर ओलसर चट्टे, खोडावर तपकिरी व गर्द तपकिरी चट्टे आढळतात. ते वाढून खोडाभोवती खोलगट भाग तयार होतो. याचे व्यवस्थापनासाठी पाण्याचा निचरा गरजेचा आहे. या रोगाचा रोप अवस्थेतही प्रादुर्भाव आढळतो. यावेळी फॅसीटील अेएल या बुरशीनाशकाची २० ग्रॅम वा मेटॅलॅक्झिल २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.