गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका
By Admin | Updated: August 4, 2016 00:38 IST2016-08-04T00:38:07+5:302016-08-04T00:38:07+5:30
शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका
मास्टर कॉलनी, गौरी नगरातील प्रकार : पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून
वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, परिसरात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेकदा जीवन प्राधिकरण व ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
वर्धा ते यवतमाळ मार्गावर असलेल्या व सावंगी (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरी नगर परिसराला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. किमान पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते; पण गत काही दिवसांपासून या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मास्टर कॉलनीमध्ये असलेली पाईपलाईन अनेक दिवसांपूर्वी फुटली होती. याबाबत नागरिकांनी जीवन प्राधिकरण तसेच सावंगी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यात गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.
मॉस्टर कॉलनीमध्ये फुटलेली पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये असल्याने अक्षरश: नालीतील सांडपाणीच नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात अनेक आजारांचा फैलाव होत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यातही ग्रा.पं. प्रशासन अपयशी ठरत आहे. या भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
‘त्या’ घरातील महिलेचे दोन महिन्यांसाठी मुलीकडे वास्तव्य
४वर्धा ते यवतमाळ मार्गाला लागूनच साधू नगराळे यांचे घर आहे. या घरात त्यांच्या पत्नीच वास्तव्य करतात. घराच्या आजूबाजूला असलेले रस्ते आणि नाल्यांची उंची अधिक झाल्याने पावसाचे तसेच सांडपाणी या घरामध्ये शिरते. परिणामी, या महिलेला पावसाळ्याचे दोन महिने आपल्या मुलीकडे राहायला जावे लागते. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलीत; पण अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पावसाचे पाणी थेट घरात शिरत असल्याने तेथे राहणेच कठीण झाले आहे. शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका राहत असल्याने एकटी महिला त्या घरात राहणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.