मुख्याध्यापकांच्या पदावनतीबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा
By Admin | Updated: December 20, 2014 22:45 IST2014-12-20T22:45:45+5:302014-12-20T22:45:45+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील १६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदावनती संदर्भात येथील लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विधानभवन नागपूर

मुख्याध्यापकांच्या पदावनतीबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा
वर्धा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील १६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदावनती संदर्भात येथील लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विधानभवन नागपूर येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे यांची उपस्थिती होती.
वर्धा जि.प. शाळांमध्ये कार्यरत २६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांपैकी १६२ मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या २ जुलै २०१४ च्या एका आदेशापैकी १६२ मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या २ जुलै १४ च्या एका आदेशाने पदावनत करून सहाय्यक शिक्षक केले. सदर कार्यवाही शिक्षण सहसंचालक यांच्या २० मे २०१४ च्या पत्रानुसार करण्यात आली होती.
या आदेशाविरूद्ध जिल्ह्यातील ६१ मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये उच्च न्यायालयाने शिक्षक सहसंचालक पुणे व जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशाला १ आॅगस्ट २०१४ रोजी स्थगिती दिली. तेव्हापासून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सदर याचिकेमध्ये वर्धा जि. प. कडून अहवाल सादर करण्यात आला व त्यामध्ये आम्ही वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केल्याचे म्हटले आहे.
राज्य शासनाकडून अद्याप उत्तर सादर व्हायचे आहे. या पदावनतीमुळे कार्यरत मुख्याध्यापकांवर अन्याय झाला आहे. प्रत्येक वरिष्ठ प्राथमिक शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापकांची नितांत आवश्यकता असल्याची स्थिती शिक्षणमंत्र्यासमोर मांडण्यात आली. त्यामुळे सर्वच प्राथमिक शाळांना स्वतंत्र उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदाकरिता १५० विद्यार्थी संख्येची अट न ठेवता १ ते ७ व ८ वर्ग असलेल्या उच्च प्राथमिक शाळेला पूर्वीप्रमाणेच विनाअट ते मान्य करीत कार्यरत असलेल्या कोणत्याही उच्च श्रेणी मुख्याध्यापकाला पदावनत करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा वर्धाचे शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान केली.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, पदाधिकारी राजेंद्र सोमनकर, कृष्णा देवकर, पुडलीक पोराटे, युवराज मिस्कीन यांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)