निराधार योजनेच्या लाभासाठी अपंग समीरची फरफट
By Admin | Updated: August 11, 2015 03:09 IST2015-08-11T03:09:06+5:302015-08-11T03:09:06+5:30
गलेलठ्ठ पगार कमविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणाचेही सोयरसुतक नसते. याचा प्रत्यय गावात येत

निराधार योजनेच्या लाभासाठी अपंग समीरची फरफट
विरूळ (आकाजी) : गलेलठ्ठ पगार कमविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणाचेही सोयरसुतक नसते. याचा प्रत्यय गावात येत आहे. गत दीड वर्षापासून तहसील कार्यालयात चकरा मारणाऱ्या अपंग समीरला अद्यापही निराधार योजनेचा लाभ देण्यात आला नाही. यामुळे सदर कुटुंबाची वाताहत होत असून याकडे लक्ष देत त्याची फरफट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
येथील कुंभार समाजात जन्मलेला समीर मानकर याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. यातही समीर लहानपणापासून अपंग आले. त्याला व्यवस्थित चालता येत नाही व बोलताही येत नाही. आई-वडील त्याला उचलून नेऊन त्याची दिनचर्या पूर्ण करतात. गावात शाळा असल्याने तो कसा-बसा दहावीपर्यंत शिकला. अपंगत्वाचा त्रास वाढल्याने त्याला शाळा सोडावी लागली. आता तो अपंगत्वाच्या वेदना सहन करीत खितपत जगत आहे. शासनाच्या अपंगांकरिता अनेक योजना आहेत; पण कामचुकार अधिकाऱ्यांमुळे अपंगांना लाभ मिळत नाही.
गत काही वर्षांपासून अपंगांसाठी निराधार योजना सुरू करण्यात आली. या निराधार योजनेचा लाभ आपल्या मुलास मिळावा म्हणून समीरच्या वडिलांनी एक वर्षापूर्वी आर्वी तहसील कार्यालयात अर्ज केला. आज ना उद्या आपल्या मुलाचे निराधार योजनेचे पैसे येतील, अशी अपेक्षा होती. सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही पैसे न आल्याने त्यांनी दुसऱ्यांदा आर्वी तहसील कार्यालयात अर्ज सादर केला. तब्बल एक वर्षाचा काळ लोटूनही अपंग समीरची निराधार योजना सुरू झाली नाही. त्याचे आई-वडील एक वर्षापासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहे. मुलाला होणाऱ्या त्रासाची माहिती तहसीलदारांची भेट घेत देण्यात आली. यावरून कारवाई करतो, असे सांगितले; पण अद्याप समीरला त्या योजनेचा लाभ मिळाला नाही.
आर्वी तहसील कार्यालयात दलालांमार्फत पैसे देऊन अर्ज केला की लगेच निराधार योजना सुरू होते; पण समीरसारख्या गरीब व अपंग व्यक्तीला एक वर्षापासून निराधार योजनेचा लाभ मिळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत १०० टक्के अपंग असलेल्या समीर मानकर यास निराधार योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)