आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुटीबोरी ते तुळजापूर महामार्गाच्या कामाकरिता कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने रोठा तलावातून मंजुर परिमाणापेक्षा तब्बल ४४ हजार २३१.५५ ब्रास गौणखनिजाचे जास्त उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलीप बिल्डकॉन कंपनीला या गौण खनिजाच्या मोबदल्यात १ कोटी ९८ लाख १५ हजार ७३४ रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.नागपूर-तुळजापूर महामार्गाच्या कामाकरिता मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन चालू असल्याने ठिकठिकाणची जमीन पोखरली जात आहे. या कामाचा कंत्राट दिलीप बिल्डकॉन लिमिडेटला देण्यात आला आहे. या कंपनीचे काम सुरुवातीपासून वादग्रस्त ठरत आहे. या कंपनीच्या कामाविरोधात अनेक ठिकाणी तक्रारीही करण्यात आल्या आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या रोठा येथील तलावातून महामार्गाकरिता गौण खनिजाच्या उत्खननाकरिता जिल्हा खनिकर्म विभागाकडे परवानगी मागितली होती. पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार दिलीप बिल्डकॉनला या तलावातून २५ हजार ब्रास गौणखनिज उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. पण, दिलीप बिल्डकॉनने परवानगी मिळाल्यानंतर वर्ष-दीड वर्षात मंजूर परिमाणाच्या दुपटीपेक्षाही जास्त उत्खनन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर जिल्हा प्रशासनाने युनिटेक मायनिंग सर्व्हे सर्व्हिस, नागपूरच्यावतीने उत्खननाचे मोजमाप केले. त्या मोजमापात ४४ हजार २३१.५५ ब्रास गौणखनिजाचे जास्त उत्खनन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जास्तीच्या गौण खनिजाच्या उत्खननापोटी १ कोटी ७६ लाख ९२ हजार ६२०, स्वामित्वधनाचे १७ लाख ६९ हजार २६२ आणि आयकर ३ लाख ५३ हजार ८५२ असा एकूण १ कोटी ९८ लाख १५ हजार ७३४ रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ही रक्कम तीस दिवसांच्या आत भरावी; अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे आता दिलीप बिल्डकॉन या रकमेचा भरणा करणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाटबंधारे विभागाने केली जाणीवपूर्वक डोळेझाकपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रोठा येथील तलावातून दिलीप बिल्डकॉन कंपनीला २५ हजार ब्रास गौणखनिजांचे उत्खनन करण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाने जिल्हा खनिकर्म विभागाकडे परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर दिलीप बिल्डकॉनने तेथून २५ हजार ब्रास ऐवजी ६९ हजार २३१ ब्रासचे उत्खनन केले. या कंपनीने तलाव खोलीकरणाच्या नावावर अख्खा तलावच पोखरून टाकला तरीही तलावाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रोठा या तलावातून मागील एक ते दीड वर्षापासून गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. दिवस-रात्र वाहतूक सुरु असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. इतकेच नव्हे तर परिमाणापेक्षा जास्त उत्खनन केल्याने तलावही धोक्यात आला आहे. येथे पाणी पिण्यासाठी जाणाºया जनावरांचा जीव जात आहे. याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच परिसरातील झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेलाही कंपनीच जबाबदार असून या रस्त्याचीही दुरुस्ती कंपनीकडून करून घ्यावी, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.सचिन खोसे, उपसरपंच, उमरी (मेघे)दिलीप बिल्डकॉन कंपनीने रोठा तलावातून मंजूर परिमाणापेक्षा जास्त गौणखनिजाचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जास्तीच्या उत्खननाच्या मोबदल्यात तीस दिवसांच्या आत १ कोटी ९८ लाख १५ हजार ७३४ रुपयांचा भरणा करण्याबाबत कंपनीला नोटीस बजावली आहे. सोबत पाटबंधारे विभाग आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणलाही पत्र दिले असून या रकमेची कंत्राटदाराच्या देयकातून वसुली करण्याबाबत सूचना केल्या आहेत.संजय दैने, अपर जिल्हाधिकारी, वर्धा
दिलीप बिल्डकॉनने पोखरला रोठा तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST
जिल्हा प्रशासनाने जास्तीच्या गौण खनिजाच्या उत्खननापोटी १ कोटी ७६ लाख ९२ हजार ६२०, स्वामित्वधनाचे १७ लाख ६९ हजार २६२ आणि आयकर ३ लाख ५३ हजार ८५२ असा एकूण १ कोटी ९८ लाख १५ हजार ७३४ रुपयांचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली. ही रक्कम तीस दिवसांच्या आत भरावी; अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यात नमूद केले आहे.
दिलीप बिल्डकॉनने पोखरला रोठा तलाव
ठळक मुद्दे४४ हजार ब्रास जादा उत्खनन : प्रशासनाने बजावली पावणेदोन कोटींच्या वसुलीची नोटीस