आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अडचण
By Admin | Updated: January 10, 2015 23:01 IST2015-01-10T23:01:51+5:302015-01-10T23:01:51+5:30
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अडचण
वर्धा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांसंदर्भात मंत्रालयात लवकरच बैठक बोलविणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत चिंता व्यक्त करीत शासन लवकरच रिक्त पदे भरेल व त्यासाठी लागणारे शासन आदेश निर्गमित करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
निवेदनानुसार महाराष्ट्र विकास श्रेणी अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षकांना वर्ग २ च्या पदावर पदोन्नती मिळण्याची कार्यवाही करण्यात यावी, आरोग्य विकास आकृतीबंध मंजुर करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लोकसंख्येनुसार आरोग्य सहाय्यक महिलांची शासन निकषा प्रमाणे दोन पदे मंजुर करण्यात यावी, डॉ. खानंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानुसार विनाविलंब कार्यवाही करण्यात यावी, मुख्य लेखा शिर्ष २२११ व २२१० अंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे मंजुर पदे कायान्वित करणे, आरोग्य सहाय्यक पुरुषांच्या वेतनत्रृटीतील तफावत दुर करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षणास मुदत वाढ द्यावी, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य सेवेत कार्यरत असलेले कुष्ठरोग तंत्रज्ञ यांची पदे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पूर्वीप्रमाणे नियमित करावे, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना मिळणारे दरमहा मानधन १२०० रुपयांवरून महाराष्ट्र राज्याच्या किमान वेतनानसुार १५ हजार करावे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन/जि.प. सेवेत सामावून घेण्यात यावे इत्यादी मागण्यावर यावेळी चर्चा करण्यात आल्या.
शिष्टमंडळात राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाने, सिद्वार्थ तेलतुंबडे, अध्यक्ष प्रभाकर सुरतकर, सचिव रतन बेंडे, कार्याध्यक्ष सुजाता कांबळे, उपाध्यक्ष विजय जांगडे, कार्यकारी सचिव दीपक कांबळे, बाबाराव कनेर, शंकर हाते, सुहास कुंटे, प्रकाश मुरमे, ओमनाथ बावणे, हिवसे यांच्च्यासह इतरही कर्मचारी वर्गाचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)