धामणगाव येथे अतिमद्य सेवनाने इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: November 23, 2015 01:48 IST2015-11-23T01:48:40+5:302015-11-23T01:48:40+5:30
तालुक्यातील धामणगाव (वाठोडा) येथील राजू ज्ञानेश्वर कांबळे (३५) या इसमाचा अतिमद्य सेवनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धामणगाव येथे अतिमद्य सेवनाने इसमाचा मृत्यू
विषारी दारूचा संशय : शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
वर्धा : तालुक्यातील धामणगाव (वाठोडा) येथील राजू ज्ञानेश्वर कांबळे (३५) या इसमाचा अतिमद्य सेवनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजता घडली. त्याचा मृत्यू विषारी दारूने झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
राजूला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सलाईन लावली असता त्याच्या तोंडाला दोनदा फेस आला. यानंतर त्याला कृत्रीम जीवनप्रणालीवर ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यात अखेर त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे त्याचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजू हा गत दोन तीन दिवसांपासून मद्यप्राशन करीत होता. अशातच शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक त्याची वाचा गेली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्याला वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र यात त्यांना यश आले नाही. त्याचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचा आरोप राजूचे नातेवाईक करीत आहे. त्याच्या शवविच्छेदन अहवालाकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)