वर्धा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे विकास कामांना असहकार्य
By Admin | Updated: July 31, 2016 00:41 IST2016-07-31T00:41:01+5:302016-07-31T00:41:01+5:30
नगर परिषदेचे कामकाज करीत असताना मुख्याधिकाऱ्यांकडून असहकार्य होत असून आमदारांचा पालिकेच्या कामात हस्तक्षेप वाढत आहे.

वर्धा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे विकास कामांना असहकार्य
नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आमदारांच्या हस्तक्षेपाचा आरोप
वर्धा : नगर परिषदेचे कामकाज करीत असताना मुख्याधिकाऱ्यांकडून असहकार्य होत असून आमदारांचा पालिकेच्या कामात हस्तक्षेप वाढत आहे. या वाढत्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ च्या नियमांना तिलांजली दिल्या जात आहे. यामुळे कामकाज करताना अनेक अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करीत वर्धेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत याकडे लक्ष वेधले.
विशेष सभा सुचित अंतर्भुत विषय या पूर्वीच्या सक्षम समितीसभेत चर्चा होऊन ठराव पारित झाले होते. त्याची तपासणी न करता तसेच अध्यक्षांशी कोणतीही चर्चा न करता विशेष सभेच्या आयोजनाला प्रतिकुल स्थिती नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप
वर्धा : न.प. चे कामकाज करीत असताना मुख्याधिकाऱ्यांकडून आजपर्यंत कोणत्याही कामाकरिता सभा आयोजन, सभा वृत्तांत दुरुस्ती तसेच काही खुलासा अहवालाबाबत आदेशित केले असता प्रतिसाद मिळत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कामकाज व विकासकामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचा अवास्तव हस्तक्षेप होत आहे. राज्य शासन विकासकामांसाठी पालिकांना निधी उपलब्ध करून देते. पालिकांनी तो निधी नियोजित कामावर नियमानुसार खर्ची घालायचा असतो. वर्धा न.प. त्याचे काटेकोरपणे अनुपालन करीत असताना कार्यान्वयक यंत्रणा म्हणून सा. बां. विभागाची नियुक्ती केली. वैशिष्ट्येपूर्ण कामाकरिता प्राप्त निधी २ कोटी रुपये जो प्रशासकीय इमारत बांधकामाकरिता आलेला होता, त्यात शासनाचे परिपत्रक काढून तो अन्य दुसऱ्या कामावर वळता केला. विशेष रस्ता अनुदानांतर्गत ४ कोटीमध्ये करावयाच्या कामाकरिता बांधकाम विभागाची यंत्रणा तयार करण्यात आली. उद्यान विकासाकरिता प्राप्त निधीतून करावयाच्या कामास सा बां. विभागाची नियुक्ती तसेच धुनिवाले मठ ते धंतोली चौक व इतर विकासकामांकरिता प्राप्त २५ कोटीच्या कामाकरितासुद्धा सा.बां. विभागाची नियुक्ती केली. वर्धेचे लोकप्रतिनिधी सुचविणार त्याच प्रमाणे कामे व्हावी, असा हट्टाहास असल्यामुळे महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ ला तिलांजली देऊन केलेला प्रकार चुकीचा आहे. तसेच मुख्याधिकारी यांनी न.प. वर्धाच्या अध्यक्षाच्या मान्यतेशिवाय विकासकामाचे प्रस्ताव सा.बां.विभागाला पाठविले. हा सर्व नियम मोडून होत असलेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी म्हणून लक्ष पुरवावे, अशी मागणी नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, गटनेता निरज गुजर, सोहनसिंग ठाकूर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर खडसे, नगरसेवक शरद आडे, सिध्दार्थ बुटले, प्रफुल्ल शर्मा, नगरसेविका वर्धा खैरकार, शिला गुजर, नलिनी पिंपळे, भारती खोंड, शांता जग्यासी, योगिता इंगळे, शैलेंद्र झाडे, आकाश शेंडे यांनी केली.(प्रतिनिधी)