सशक्तीकरण अभियानातून गावांचा विकास

By Admin | Updated: August 3, 2014 00:14 IST2014-08-03T00:14:51+5:302014-08-03T00:14:51+5:30

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्याला जिल्हा संसाधन केंद्र, बारा ग्रामपंचायत भवनची कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

Development of villages through empowerment campaign | सशक्तीकरण अभियानातून गावांचा विकास

सशक्तीकरण अभियानातून गावांचा विकास

जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती : १२ ग्रा़पं़ भवनाची कामे मंजूर
वर्धा : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्याला जिल्हा संसाधन केंद्र, बारा ग्रामपंचायत भवनची कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
पंचायत राज व्यवस्थेची बलस्थाने, आव्हान लक्षात घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेत भौतिक, मानवी, तांत्रिक व आर्थिक संसाधनांनी सुसज्ज तसेच लोकसहभागाद्वारे नियोजन करून राज्यातील ग्रामीण क्षेत्राचा जलद, संतुलित व शाश्वत विकास साधणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे़ या अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असून राज्यातील साडेआठ हजार ग्रा़पं़ मध्ये सुक्ष्म नियोजनाच्या प्रक्रियेद्वारे गाव विकास आराखडा तयार करण्याचे सहा दिवसीय प्रशिक्षण गावस्तरावर घेण्यात येणार आहे़ तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रा़पं़ मध्ये बदलत्या गरजा व नागरी सुविधांचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याचा उपक्रम यात समाविष्ट राहणार आहे, असेही चौधरी यांनी सांगितले. अभियानाच्या उद्दिष्टानुसार जि़प़, पं़स़ अभियान यशस्वीतेसाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत जि़प़, पं़स़, ग्रा़पं़ पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात पं़स़ स्तरावर पंचायत सबळीकरण मेळावा तर जि़प़ गटस्तरावर नेतृत्व विकास शिबिर घेण्यात येणार आहे. अभियानात गतीशील कामकाजासाठी अधिक मनुष्यबळ, ग्रा़पं़ ना पायाभूत सुविधा, जिल्हा पंचायत संसाधन केंद्र, क्षमता बांधणी, प्रशिक्षण आदी विषयांवर भर देण्यात येणार आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व ज्ञान वर्धनाकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रा़पं़ महिला सदस्यांकरिता क्रांतीज्योती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात पंचायतीकरिता अभियंत्यांची तसेच प्रत्येक पं़स़ साठी एका अभियंत्याची नेमणूक करण्यात येणार आहे़ अभियानात सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही उदय चौधरी यांनी केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Development of villages through empowerment campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.