आजनसरा देवस्थानचा विकास; पण गाव भकासच
By Admin | Updated: February 26, 2017 00:58 IST2017-02-26T00:58:20+5:302017-02-26T00:58:20+5:30
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानची किर्ती व प्रसिद्धी दररोज वाढत आहे.

आजनसरा देवस्थानचा विकास; पण गाव भकासच
विकासाकडे दुर्लक्ष : ग्रा.पं. प्रशासन व देवस्थानचा पुढाकार गरजेचा
अल्लीपूर : विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानची किर्ती व प्रसिद्धी दररोज वाढत आहे. तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने देवस्थान परिसराचा विकासही होत आहे; पण गावे मात्र भकासच असल्याचे चित्र आहे. हे चित्र पालटण्याकरिता गावांचा विकास होणे गरजेचे झाले आहे.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून या गावात दररोज पुरण पोळीचा नवस फेडण्यासाठी म्हणून हजारो भोजाजी भक्त स्वयंपाक घेऊन येतात. संत भोजाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यास्तव भाविकांच्या रांगा लागतात. असे असले तरी आजनसरा गावाचा विकास होताना दिसत नाही. वडनेर व सिरजगाव रस्त्याने गावात प्रवेश करताना दुरवस्था समोर येते. हागणदारीयुक्त रस्ते, अस्वच्छता, खड्डेमय रस्ते, नाल्याची सोयच नसलेले गाव भाविकांच्या दृष्टीस पडते. सर्वदूर किर्ती पसरलेले गाव प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ‘नाव मोठे, दर्शन खोटे’, असेच भासते. शासन ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, हागणदारी मुक्ती, शौचालय बांधकाम, आरोग्यावर लाखो रुपये खर्च करीत आहे; पण ते येथे कागदोपत्रीच खर्च झाल्याचे दिसते. आजनसरा ग्रा.पं. चे सचिव सुटे एक महिन्यापासून आजारी असून रजेवर असल्याचे सांगतात. ग्राम सफाईसाठी एक कर्मचारी होता; पण त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने तोही कामावर येत नाही. मी गावात येताच नक्की लक्ष देईल, असे सचिव सांगतात. परिणामी, या गावात ग्रा.पं. प्रशासन आहे की नाही, शासनाच्या योजना लागू आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.
देवस्थानसमोर नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. गावात अस्वच्छता असून शेणखताचे ढिगारे, केरकचरा रस्त्याच्या कडेलाच पडून असतो. पऱ्हाट्याचे ढिगारे, घाण पसरली आहे. ग्रा.पं. प्रशासन व देवस्थानने गाव विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)