तंटामुक्त गाव पुरस्कारातून गाव विकास करा

By Admin | Updated: November 13, 2014 23:07 IST2014-11-13T23:07:17+5:302014-11-13T23:07:17+5:30

महात्मा गांधी तंंंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत ४८५ तंटामुक्त गावांना पुरस्कार मिळाले असून, पुरस्काराची रक्कम गाव समितीने अद्याप खर्च केलेली नाही. तंटामुक्त गाव समितीने लोकहिताच्या

Develop village development through a tantam gava award | तंटामुक्त गाव पुरस्कारातून गाव विकास करा

तंटामुक्त गाव पुरस्कारातून गाव विकास करा

वर्धा : महात्मा गांधी तंंंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत ४८५ तंटामुक्त गावांना पुरस्कार मिळाले असून, पुरस्काराची रक्कम गाव समितीने अद्याप खर्च केलेली नाही. तंटामुक्त गाव समितीने लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे तात्काळ घ्यावीत अशा सूचना जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी गुरुवारी दिल्यात.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पत्रकारांसाठी महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम अंतर्गत असलेल्या पुरस्काराच्या धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. २०१२-१३ या वर्षामध्ये प्रवीण होणाडे यांना विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार जाहीर झाला होता. तसेच जिल्हास्तरावर मालती गावंडे यांना पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही पुरस्काराच्या धनादेशाचे वितरण जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कानुज प्रसाद, उपविभागीय महसूल अधिकारी विलास ठाकरे, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर तसेच महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात शांतात राहावी तसेच गावातील तंटे गावातच सोडविण्याच्या दृष्टीने तलाठी, पोलीस पाटील व ठाणेदार यांनी ग्रामस्तरावर नियमित बैठकी घेवून या योजनेबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची आवश्यकता व्यक्त करताना जिल्हाधिकारी सोना म्हणाले, जिल्ह्यात १३ ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नसून या ग्रामपंचायतींना या मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रत्येक गावात पोलीस पाटलाची नियुक्ती असणे आवश्यक असून ज्या गावामध्ये अद्यापर्यंत नियुक्तया झाल्या नाहीत अशा गावाचे प्रस्ताव सादर करावे तसेच तंटामुक्त आदर्श गावाना मिळालेला पुरस्कारातून गावात आवश्यक सुविधा निर्माण करुन यासंबंधीचा अहवाल एका महिन्यात सादर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी सांगितले.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत विभागीय स्तरावर द्वितीय ठरलेल्या प्रवीण होणाडे यांना ७५ हजार रुपयाचा धनादेश तसेच जिल्हा स्तरावरील मालती गावंडे यांना २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी पत्रकारांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Develop village development through a tantam gava award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.