नेरीवासियांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
By Admin | Updated: May 17, 2017 00:35 IST2017-05-17T00:35:26+5:302017-05-17T00:35:26+5:30
नेरी (मिर्झापूर) हे १०५ घरांचे गाव. लोकसंख्या ४५० च्या जवळपास. गावात नव्याने ग्रामपंचायत स्थापित झाली.

नेरीवासियांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
वॉटर कप स्पर्धा : श्रमदानातून जलस्त्रोत केले विकसित
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नेरी (मिर्झापूर) हे १०५ घरांचे गाव. लोकसंख्या ४५० च्या जवळपास. गावात नव्याने ग्रामपंचायत स्थापित झाली. ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी या गावाने गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. स्पर्धेत गावाला पुरस्कार मिळाला नाही तरी चालेल, परंतु गाव पाणीदार करून दाखवू व दुष्काळाला पिटाळून लावू, असा ग्रामस्थांचा निर्धार आहे.
गावात पाणीटंचाई असल्यामुळे उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. या स्पर्धेनिमित्त सरपंच बाळ सोनटक्के यांनी गावातील तरूण-तरूणी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सरपंच व गावातील काही मुला-मुलींना प्रशिक्षण घेतले. गाव पाणीदार करताना अनेक समस्या होत्या. या गावाजवळ शेतशिवार नव्हते. त्यामुळे बाजूच्या मौजे व शिवारात काम करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याशी संपर्क करून कामे करायचे होते. मात्र या अडचणींवर मात करुन गावातील शेतमजूर, तरूण-तरूणी श्रमदानासाठी पुढे सरसावले. वाढदिवसाचे कार्यक्रम बंधाऱ्यावर साजरा करून भेट म्हणून आलेली रक्कम पाणी फाऊंडेशनला दिली. श्रमदानाला सुरूवात झाल्यावर ग्रामस्थांसोबत वर्धा, आर्वी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी संवाद साधला. नेरी मिर्झापूर गाव पाणीदार व्हावे याकरिता पुढे आल्या. यात इंडियन रेडक्रॉस, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, मदत फाऊंडेशन, अंगणवाडी सेविका, बचत गट, पोलीस विभाग, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय, गांधी विद्यालय, कृषक कन्या विद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, गजानन महाराज संस्थान, कारंजा यांनी तसेच आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, डॉ. रवींद्र सोनटक्के, मदत फाऊंडेशनच्या अनिता श्यामसुंदर भुतडा, डॉ. अविनाश कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, डॉ. अरूण पावडे, डॉ. सचिन पावडे, डॉ. राणे, प्राचार्य डॉ. हरिभाऊ वेरूळकर, प्राचार्य अभय दर्भे आदींनी विहीर पुनर्भरण, वृक्ष खड्डे असे कामे ग्रामस्थांसह केले. गावकऱ्यांचा उत्साह वाढावा याकरिता सिने अभिनेते जितेंद्र जोशी यांनी भेट देवून झालेल्या कामाचे कौतुक केले.