बोर नदीपात्राचा खोलीकरण प्रस्ताव धूळ खात
By Admin | Updated: March 20, 2016 02:14 IST2016-03-20T02:14:15+5:302016-03-20T02:14:15+5:30
येथील बोर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वेलवनस्पती वाढल्या आहेत.

बोर नदीपात्राचा खोलीकरण प्रस्ताव धूळ खात
पाणी दूषित : दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
सेलू : येथील बोर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वेलवनस्पती वाढल्या आहेत. नदीच्या पात्रातील पाणी दिसत नाही. हिरवागार गालिचा नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसतो. यामुळे नदी पात्र दूषित झाले असून दुर्गंधी पसली आहे. नदीपात्र खोलीकरणाचा प्रस्ताव मात्र धूळखात आहे.
बोर नदीवर स्मशानभूमीजवळ बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे बोरनदीच्या नवीन व जुन्या पुलाखाली तसेच त्या मागे शंकरजी देवस्थानपर्यंत पाणी थोपले आहे. या थोपलेल्या पाण्यावर शेवाळ व पानांचा वेल वाढला आहे. तो एवढा पसरला की, संपूर्ण पात्रात पाणी आहे, याचा पत्ताच लागत नाही. बोरधरण पूढे हिंगणी, मोही, किन्ही, ब्राह्मणी, घोराड आदी गावांतून वाहणारी ही नदी सेलूपर्यंत येते. मधेही काही गावांत बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे नदी खळखळ वाहत नाही व पात्राची सफाई होत नाही. नदीपात्र खोल करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)
नदीचे पात्र खोल करण्यासाठी सातत्याने गावोगावच्या ग्रा.पं. तसेच सेलू नगरपंचायतने शासनाकडे प्रस्ताव सादर केलेत; पण नदी खोलीकरण व साफसफाईबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. नदीचे पात्र उथळ झाले. ते खोल करून साफसफाई करणे गरजेचे आहे.